
शालेय जीवनातच व्यावसायिक शिक्षण गरजेचे
पिंपरी, ता. १८ : ‘‘मुलांची शैक्षणिक पायाभरणी शालेय जीवनातच होत असते. त्यांना सुरुवातीपासूनच व्यावसायिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, इन्स्टिट्यूट यांनी शालेय शिक्षणाशी कनेक्ट होण्याची जास्त गरज आहे. असे असे झाल्यास परिपूर्ण विद्यार्थी घडतील, यातून चांगले भविष्य घडेल, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.
‘सकाळ’ माध्यम समुहाने दहावी-बारावी नंतरच्या करिअर संधीची माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यासाठी ''सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२'' चे आयोजन चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घघाटन मांढरे यांच्या हस्ते शनिवारी (ता. १८) झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी युवा अभिनेता तेजस बर्वे, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, चीफ मार्केटिंग ऑफिसर नवल तोष्णीवाल, भारती विद्यापीठाचे फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटचे डीन डॉ. सचिन वर्णेकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्रा. सुनील चवळे, एमआयटी आर्टस् कॉमर्स, सायन्स आळंदी येथील डेप्युटी रजिस्ट्रार गौरव मगर, उपप्राचार्य अक्षदा कुलकर्णी, सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे विवेक सेहगल, सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष आर. एस. यादव, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चीफ ब्रॅडिंग ऑफिसर रजय थॉमस, एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपल कविता उपलांचीकर, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे शाम देशमुख, प्रतिभा इन्स्टिट्यूटचे दीपक शहा, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे रजिस्ट्रार योगेश भावसार व प्राचार्य संदीप पाटील आदी उपस्थित होते.
मांढरे म्हणाले, ‘‘दक्षिण कोरियाची शिक्षण पद्धती ९३ टक्के व्होकेशनलाईस झालेली आहेत. अमेरिका, युरोप पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक व्होकेशनलाईस आहे. भारत मात्र केवळ पाच टक्क्यांवर असल्याचे अहवालातून समोर आले. त्यामुळे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या शिक्षणाचा माझ्या आयुष्यासाठी किती टक्के उपयोग होऊ शकतो, हे पाहणे आवश्यक आहे. दरम्यान, दक्षिण कोरियात वकिलीचे शिक्षण घेणारा पदवी घेतल्यानंतर थेट न्यायालयात प्रॅक्टिस करण्याच्या क्षमतेचा झालेला असतो. मात्र, आपल्याकडे बीकॉम पदवीने विद्यापीठात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याला एखाद्या अकाउंटचे काम करायला लावले, तर त्याला ते कितपत येईल, याबाबत शंका आहे. तसेच सिव्हिल इंजिनिअरला पदवी घेतल्यानंतर लगेच एखाद्या पुलाचे काम करण्यास सांगितल्यास ते होईल की नाही याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे सर्वानी शालेय शिक्षणाशी कनेक्ट होण्याची जास्त गरज आहे.’’
ते म्हणाले, ‘‘मुलांच्या शिक्षणाची पायाभरणी आठवी, नववीपासूनच केल्यास मुले चांगली घडतात. या काळात त्यांना परिपूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही काही संस्थांशी सामंजस्य करारही (एमओयू) केलेले आहेत. येथीलही संस्थांनी आमच्यासोबत यावे. पूर्वीसारखे शिक्षण राहिलेले नाही. सध्या साठ टक्के गुण मिळालेला विद्यार्थी मिळणे कठीण आहे. आता सर्वांनाच ९० टक्के गुण मिळू लागले आहेत. यामुळे लोकांचीही गफलत होत आहे. ज्ञानाच्या अधिक वाटा असून त्याचा विचार व्हावा. जगाने केव्हाच चौकट मोडलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही चौकट मोडून बाहेर पडायला हवे. ज्ञानाच्या कक्षात रुंदावत चालल्या असून त्याचे भागीदार व्हावे.’’
संपादक फडणीस म्हणाले, ‘‘या एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या शिक्षण संस्था अशा आहेत ज्या शिक्षणाच्या पलीकडे मुलांना नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथे पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक मुलाला, पालकाला एक नवीन पर्याय मिळेल.’’
---------
येथे आल्यानंतर खूप छान वाटत आहे. या एक्सपोमधून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. मलाही वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
- तेजस बर्वे, अभिनेता.
-----------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81316 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..