
विद्यार्थी, पालकांच्या प्रचंड गर्दीत समारोप
पिंपरी, ता. १९ : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित दोन दिवसीय ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालक व विद्यार्थ्यांची दिवसभर प्रचंड गर्दी राहिली. सर्वांनी प्रत्येक संस्थेच्या स्टॉलला भेट देत माहिती जाणून घेतली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची माहिती एकाच छताखाली मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. रविवारी (ता. १९) अखेरच्या दिवशी प्रचंड गर्दी झाली होती.
चिंचवडमधील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे शनिवार (ता. १८) व रविवार (ता. १९) या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. शहर व परिसरातील तीसहून अधिक नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे उपलब्ध असणाऱ्या पर्यायाची माहिती, तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरियर डिझाइन, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून मिळाली.
तसेच करिअर विषयी विविध क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. करिअर घडविण्यासाठी कोणते क्षेत्र निवडावे, संधी कुठे उपलब्ध होऊ शकते आदींबाबत मार्गदर्शन मिळाले. रविवारी प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असल्याने सकाळपासूनच गर्दी होती.
-----------
सेलिब्रेटींसोबत सेल्फीसाठी झुंबड
या प्रदर्शनाला रविवारी ‘आठवा रंग प्रेमाचा'' या चित्रपटातील कलाकार मकरंद देशपांडे, विशाल आनंद यांनी तसेच ‘फनरल’ चित्रपटाचे अभिनेते आरोह वेलणकर यांनी भेट दिली. ''सकाळ''ने राबविलेल्या या उप्रक्रमाचे त्यांनी कौतुक केले. येथील स्टॉलला भेट देत शैक्षणिक संस्थांची माहिती जाणून घेतली. दरम्यान, या कलाकारांना पाहण्यासह त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची झुंबड उडाली होती.
----------
(सेलिब्रेटी प्रतिक्रिया )
अनेकांना किती प्रकारचे कोर्सेस आहेत. किती संस्था आहेत याची माहितीही नसते. मात्र, येथे अनेक शैक्षणिक संस्था उपलब्ध झाल्याने विद्यार्थी, पालकांना पर्याय उपलब्ध झाले. येथे आल्यास त्यांना समोरासमोर चर्चा करता येईल. आपल्या शंका विचारता येतील. सध्याच्या शिक्षण प्रणालीत मोठे बदल झाले आहेत. अनेक पालकांना याबाबतची माहितीही नाही. अशांसाठी हे प्रदर्शन फार उपयुक्त आहे. केवळ पदवी घेतली म्हणजे शिक्षण झाले. अशा चौकटीत न राहता इतरही कोर्सेस करायला हवेत.
आमचा ''आठवा रंग प्रेमाचा'' हा नवीन चित्रपट ॲसिड ॲटॅकवर आधारित आहे. आठवा रंग म्हणजे अतिरेकाचा रंग आहे. या कथेतून खूप मेसेज दिला आहे.
- मकरंद देशपांडे, अभिनेता
---------
प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यायला हवे. आपल्या मुलाला कोणत्या क्षेत्रात रस आहे, त्याची आवड काय आहे, हे पालकांनी ओळखणे गरजेचे आहे. त्यानुसारच मुलांच्या करिअर बाबतचा निर्णय घ्यावा. ''सकाळ'' आयोजित या प्रदर्शनात भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. दरम्यान, ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. प्रेयसीवर ॲसिड हल्ला झाल्यानंतर प्रियकर तिला पूर्ण सपोर्ट करीत तिच्या पाठीशी उभा राहतो, तिला पुढे जगण्यासाठी दिशा देतो, असा माझा रोल आहे.
- विशाल आनंद , अभिनेता
--------
''सकाळ''ची ही संकल्पना मला खूप आवडली. विद्यार्थी व पालकांनी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करण्यापेक्षा ''सकाळ''ने एकाच छताखाली विविध संस्था एकत्र आणल्याने विद्यार्थी व पालकांना विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद पाहून आनंद झाला. माझा फनरल हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहे. या चित्रपटाला पुरस्कार मिळतील अशी अपेक्षा आहे.
- आरोह वेलणकर, अभिनेता
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81657 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..