अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी ब्रिकेटसचा वापर करण्याचे धोरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil
अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी ब्रिकेटस महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची योजना; संस्थांकडून मागविले अर्ज

अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी ब्रिकेटसचा वापर करण्याचे धोरण

पिंपरी - अंत्यविधीसाठी बहुतांश ठिकाणी गॅस व विद्युत दाहिनीचा वापर केला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी अजूनही लाकडांचा वापर केला जात असल्याने वृक्षतोड होऊन पर्यावरणाची हानी होते. ती टाळण्यासाठी लाकडाऐवजी ब्रिकेटसचा वापर करण्याचे धोरण महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी आखले आहे. त्यासाठी चिंचवड लिंकरोड, भोसरी व निगडी स्मशानभूमीमध्ये ब्रिकेटस बनवणाऱ्या संस्थांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशा संस्थांकडून अर्ज मागविले आहेत.

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनासाठी महापालिकेतर्फे शहरात प्लॅस्टिक मुक्त पीसीएमसी मोहीम, महापालिका कर्मचाऱ्यांना ई-व्हेईकल खरेदीसाठी अग्रिम व अनुदान देणे, नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी ई-व्हेईकल चार्जिंग पॉइंट उभारणे, नद्यांमधील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी रिव्हर प्लॉगेथॉन मोहीम असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता पर्यावरणपूरक अंत्यविधीला प्रोत्साहन देण्यासाठी लिंकरोड, भोसरी व निगडी स्मशानभूमीमध्ये ब्रिकेटस वापरले जाणार आहेत. ब्रिकेटस बनविण्यासाठी संबंधित संस्थांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित संस्थांना अटी व शर्तींची पूर्तता करावी लागेल. अशा संस्थांनी १५ दिवसांत पात्रतेबाबतचे अर्ज कागदपत्रांसह महापालिकेच्या आरोग्य मुख्य कार्यालयात सादर करावेत, अशी माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.

काय आहे ब्रिकेटस

लाकडाचा भुस्सा, पालापाचोळा, झाडांचे अवशेष वापरून किंवा कोळशाचा भुगा दाबून ब्रिकेटस तयार केले जातात. त्याचा चौकोनी किंवा लंबगोल, आयताकार असे गोळे किंवा वीट तयार केली जाते. त्याला कॉम्प्रेस्ड कोळसा असेही म्हटले जाते. सरपणासाठी याचा वापर होतो.

संस्थांसाठी गरजेचे

- अंत्यविधीसाठी ब्रिकेटस वापरताना स्मशानभूमीत सद्यःस्थितीत उपलब्ध लोखंडी सांगाड्यामध्ये गरजेनुसार बदल करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची

- अंत्यसंस्काराची स्वतंत्र अद्ययावत नोंद रजिस्टर ठेवणे, प्रत्येक अंत्यविधीची नोंद ठेवणे, मृतदेहाचे वजन, त्यासाठी वापरलेल्या ब्रिकेटसच्या वजनाची नोंद ठेवणे

- ब्रिकेटस विक्रीसाठीची परवानगी एक वर्षाची असेल. पात्र नियुक्त संस्थांना काम सुरू करण्यापूर्वी एक लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल

- एका कामासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास, तसेच ब्रिकेटसचा दर समान असल्यास पात्र संस्थेस सोडत पद्धतीने काम देण्यात येईल

- मंजूर दराप्रमाणे वापरलेल्या ब्रिकेटसची रीतसर पावती मृतांच्या नातेवाईकांना देणे, अंत्यविधीसाठी लागणारे ब्रिकेटसचे वजन व त्याचा दर नमूद करणे

- ब्रिकेटस वापराबाबत जाहिरातीद्वारे आवाहन करणे, ब्रिकेटसची व्यवस्था संबंधित संस्थेने स्वखर्चाने करणे, ब्रिकेटस व्यतिरिक्त साहित्याची माहिती देणे आवश्यक

- ब्रिकेटस व त्यांचा पुरवठा केलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक असून, शासकीय परवाने घेण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असेल

- ब्रिकेटस विक्री व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क संस्थेस आकारता येणार नाही.

अंत्यविधीसाठी ब्रिकेटस वापरल्यास वृक्षतोडीस आळा बसेल. पर्यायाने पर्यावरणाची हानी टळेल. तसेच राखेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मात्र, अंत्यविधीसाठी ब्रिकेटसचा वापर करणे मृतांच्या नातेवाइकांवर बंधनकारक नाही.

- राजेश पाटील, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83260 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..