माठ भरोनी, चला जाऊ गुवाहाटीच्या बाजारीऽऽऽऽ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माठ भरोनी, चला जाऊ 
गुवाहाटीच्या बाजारीऽऽऽऽ’
माठ भरोनी, चला जाऊ गुवाहाटीच्या बाजारीऽऽऽऽ’

माठ भरोनी, चला जाऊ गुवाहाटीच्या बाजारीऽऽऽऽ’

sakal_logo
By

माठ भरोनी, चला जाऊ
गुवाहाटीच्या बाजारीऽऽऽऽ’

‘थाट करोनी, माठ भरोनी, घ्या गं सगळ्या शिरी...चला जाऊ गुवाहाटीच्या बाजारीऽऽऽऽ’ अशी गवळण म्हणत चार- पाच गवळणी माठात काही तरी घालून, विक्री करायला बाजाराला निघाल्या आहेत.
(तेवढ्यात कुणी ‘ईडी’ घ्या, कुणी मंत्रिपद घ्या, कुणी रोख पैसं घ्या अशी जोरजोरात हाळी ऐकू येते.)
मावशी ः सांभाळा गं पोरींनो, सध्याचा काळ फार वाईट हाये. कुणावर इश्‍वास ठेवू नका. कोणी
कसल्याही खाणाखुणा करून, तुम्हाला फसवंल. ‘नाथा घरची उलटी खूण’ एवढं लक्षात ठेवा मग ‘नाथ’ हा ‘एक’ आसंल नाहीतर दोन आसंल.
(तेवढ्यात दोघेजण येऊन ‘इस्टॉप, इस्टॉप...एकदम इस्टॉपऽऽ’ असे म्हणत गवळणींचा रस्ता अडवतात.
मावशी ः ए कोण रं तू आम्हाला अडवणारा?
श्रीकृष्ण ः अगं मला ओळखलं नाहीस. मी देवाधिदेव किसनदेव..नंद- यशोदेचा पुत्र आणि करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलणारा पेंद्याचा मित्र.
श्रीकृष्ण ः पर तू हायेस तरी कोण? गडी का बाई?
मावशी ः मी बाईच हाये पर तुला का नको त्या चवकाशा?
श्रीकृष्ण ः मग तुझ्या व्हटांवर मिशा कशा?
मावशी ः कशा मंजे? मी माझ्या बापावर गेलेया.
श्रीकृष्ण ः मावशे, एवढ्या अंधारात कुठं पळून तर चालला नाही ना? तुमच्या सगळ्यांचा मोबाईलही ‘आऊट आॅफ कव्हरेज का येतोया?
मावशी ः दिवस उजाडायच्या आत अंधारातच आमाला गुवाहाटीचा बाजार गाठायचाय. तरच आमच्या बंडखोरीच्या मालाला किंमत मिळंल.
श्रीकृष्ण ः तुमी आता दही, दूध इकणं बंद केलंय का?
मावशी ः काय मिळतंया त्यात. घरखर्च तरी भागतुया का? आमच्या हक्काचं दही, दूध असूनसुद्धा, ‘लोणी’ मात्र दुसऱ्या गटातील गवळणींनाच मिळाया लागलंया. तीन मालकांनी एकत्रित येऊन, दुधाची डेअरी काढली. तवा आम्ही या एकत्रित डेअरीला लई विरोध केला. पंचवीस वर्षांपासून सोयरिक जुळलेल्या मालकाशी पुन्हा सूत जुळवा, अशाही इनवण्या केल्या. पर आमच्या मालकावर काय परिणाम झाला नाय. गेल्या दोन- अडीच वर्षात डेअरीचा आर्थिक व्यवहार बघणारा दुसरा मालक त्याच्याच लोकांचाच फायदा बघतुया. आमच्या वाट्याला येतीया शिळी कढी. आता त्या शिळ्या कढीला आमी किती ‘ऊत’ आणायचा? तुमीच सांगा.
श्रीकृष्ण ः तुमच्यासारख्या लोकांचाच सध्या ‘ऊत’ आलाया.
मावशी ः टीचभर पैशात आमी घरच्यांची कामं तरी कोणती करायची? एवढंच पैसं मिळत्यात, असं म्हणून त्यांना कसं तोंड दाखवायचं.
श्रीकृष्ण ः तुमच्याबरोबरच्या अजून गवळणी कुठंयत?
गवळण ः आमी पुढं चाललोया, बाकीच्या बी गुपचूप मागून आमाला मिळतील. मालक सोडून सगळेजण येतील, असा आमाला इश्‍वास हाये. आमच्या मालकाच्या विरोधकांनं आमची सगळी जबाबदारी घेतलीया.
श्रीकृष्ण ः पण तुम्ही तर मूळ मालकाला फसवून गद्दारी करताया?
गवळण ः छ्या.. छ्या... असं वंगाळ बोलू नका. आमी त्यांच्याच फायद्यासाठी सगळं करतुया. आम्ही अजून बी त्यांनाच मानतुया. आमच्या गटाचं नाव बी त्यांच्यावरूनच ठेवलंया. उलट मालकांनी त्यांच्या मुलांसकट आमच्यात सामील व्हायला हवं, अशी आमची विच्छा हाये. त्यासाठी आमी ‘विच्छा माझी पुरी करा’चा खेळ बी लावलाय.
श्रीकृष्ण ः बरं तुमच्या माठातला माल दाखवल्याशिवाय आमी तुमाला इथून सोडणार नाय.
मावशी ः आमच्या माठात निष्ठा, प्रामाणिकपणा, मालक आणि डेअरी यांच्याविषयीची आपुलकी हाये. तीच आम्ही इकायला चाललोया. सध्याच्या काळात त्यालाच लई भाव आलाया. हे सगळं इकून
आम्ही गडगंज श्रीमंत हुताया का नाय बघा. पुढच्या येळंला आमी डेअरीत परत येतो का नाय, याची काय ग्यारंटी हाये?
श्रीकृष्ण ः (हताश होत) तुमच्यासारख्या लोकांनी डेअरीचा पार तमाशा केलाया.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m83862 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top