
अकरावीसाठी अर्ज भरताना अडचणी ‘नॉन क्रिमीलेअर’ प्रमाणपत्राच्या अटीमुळे पालक त्रस्त
पिंपरी, ता. २७ ः शालेय शिक्षण विभागाने दोन वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट घातली आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून याबाबत पालकांना कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नसल्याने अनेक पालकांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ही अट तातडीने काढावी, अशी मागणी पालक करत आहेत. ऐन प्रवेश हंगामात हे प्रमाणपत्र मिळवणार कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अकरावी प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अकरावीसाठी आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज पहिल्या टप्प्यात अंतिम झाले आहेत. मात्र, अकरावी प्रवेशासाठी आरक्षणाची सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. ऐन प्रवेश परीक्षेच्या वेळी ही अट समोर येत असल्याने विद्यार्थी व पालकांसमोर हे प्रमाणपत्र कसे आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याउलट ही अट दोन वर्षापासून लागू केल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
ही अट दोन वर्षांपासून लागू असली तरी दरवर्षी नवे विद्यार्थी आणि पालक असतात. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना शाळास्तरावरच याची माहिती देणे अपेक्षित आहे. तसेच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आधी तहसील कार्यालयाकडून उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागतो. त्यानंतर प्रांत कार्यालयाकडून नॉन क्रिमीलेअरचे प्रमाणपत्र मिळते. सेतू केंद्रावर तासनतास रांगा लावून हे प्रमाणपत्र मिळवावे लागते. त्यामुळे पालक व विद्यार्थी हैराण झाले आहेत.
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कशासाठी?
इतर मागास प्रवर्गातील विशेष मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती या संवर्गातील लोकांना शैक्षणिक व आरक्षणाच्या सवलतींसाठी उत्पन्न गटाचे तत्व लागू केले आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या आत असलेल्यांना उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉन क्रिमीलेअर) दिले जाते. या प्रमाणपत्राचा वैधता काळ हा एक वर्षांचा असल्याने सवलती प्राप्त करू इच्छिणाऱ्या इतर मागास गटातील लोकांना असे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी धावपळ करावी लागते.
कोट
गेल्या दोन वर्षांपासून ‘नॉन क्रिमीलेअर’ प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. याची माहिती पालकांना नसल्याने अर्ज भरताना ही बाब पालकांच्या निदर्शनास येत आहे. ही अट तातडीने रद्द करावी, अशी मागणी पालक करत आहेत.
-स्नेहल माहुलकर, पालक पिंपरीगाव
अकरावी प्रवेशाचे पहिल्या टप्यातील अर्ज भरले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या अर्जात चुका होऊ नये म्हणून मे महिन्याच्या अखेरी सराव अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर अकरावी ऑनलाइन अर्ज पहिला टप्पा भरण्यास प्रारंभ केला आहे. या अर्जासाठी दीड लाखांवर विद्यार्थ्यांनी नोंदणीही केली आहे.
-सोना पाटील, पालक निगडी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84267 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..