
रस्ता दुभाजकाची लांबी वाढवणार
पिंपरी/वाकड, ता. २८ : वाकडच्या भूमकर चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारी (ता. २८) दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकातील वाहतुकीची पाहणी केली. हिंजवडीकडे जाणारी एक लेन अर्ध्या तासासाठी सुरू करून पुन्हा बंद केली. रस्ता दुभाजकाची लांबी वाढविणे व तसा प्रस्ताव बीआरटीएस विभागाला देण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली.
भूमकर चौकात नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक व वाहनचालकही त्रस्त आहेत. त्यावर प्रकाश टाकत ‘सकाळ’ने सलग दोन दिवस सविस्तर वृत्त दिले. त्याची दखल घेत सोमवारी ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील पिंजण यांनी चौकात प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक समस्येचा आढावा घेतला. वास्तव परिस्थिती पाहून काळाखडक कोपरा ते जाधव कॉर्नरपर्यंत रस्ता दुभाजकाची लांबी वाढविण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यावर एकमत झाले असून त्याबाबतचा प्रस्ताव वाहतूक पोलिस व ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून बीआरटीएस विभागास सादर केला जाणार आहे. शिवाय, वाहतुकीत किरकोळ बदल करून उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या.
पदपथाची उंची वाढवा...
ट्रॅफिक झाल्यावर सकाळी साडेनऊ ते १० वाजेपर्यंत बॅरिकेड काढून हिंजवडीकडील लेन सुरू केली होती. त्यानंतर दिवसभर परिस्थिती जैसे-थे होती. एक लेन बंद न करता दिवसभर संपूर्ण रस्ता चालू ठेवावा व पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथाची उंची वाढवून ते पादचाऱ्यांसाठी चालू करावेत, अशी मागणी सागर भूमकर, अर्जुन ठाकूर व अमित सिंग यांनी केली.
नागरिक म्हणतात...
- पदपथाची उंची वाढवून पादचाऱ्यांसाठी चालू करावेत
- हिंजवडीकडील लेन पूर्णवेळ चालू केल्यास समस्या सुटणार
- डांगे चौक ते भूमकर चौक रस्त्याचे रुंदीकरण करावे
- भुयारी मार्गाची रुंदी वाढवावी
भूमकर चौकातील व्यथा नित्याची आहे. डांगे चौक ते भूमकर चौकदरम्यान अर्धा किलोमीटर रस्ता रुंदीकरण बारा वर्षांपासून रखडले आहे. डांगे चौकात ग्रेटसेपरेटर झाल्याने वाहने सुसाट येतात. पण, पंडित पंपासमोर रस्ता एकेरी असल्याने अपघात होतात. याचा परिणाम भूमकर चौकातील कोंडीवरही होतोय. तिथे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना पोलिसांचे.
- रमेश चव्हाण, स्थानिक रहिवासी, थेरगाव
भूमकर चौकातील एक लेन आम्ही कायमची बंद केलेली नसून गरजेनुसार ती बंद आणि सुरू करतो. त्यातच काही अतिक्रमणे देखील वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. मात्र या रस्त्यावर काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
- सुनील पिंजण, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
भूमकर चौकातील समस्येबाबत आमच्या विभागात चर्चा झाली आहे. महापालिका ट्रान्स्पोर्टेशनचे कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, कन्सल्टंट प्रताप भोसले व वाहतूक पोलिस अधिकारी या सर्वांसमवेत लवकरच बैठक होणार आहे. त्याद्वारे ही समस्या सोडविण्यासाठी सर्वंकष विचार करून निर्णय घेतला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल.
- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, बीआरटी, विभाग महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m84866 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..