
कोंडीमुक्त पुनावळेसाठी ‘वन-वे’
पिंपरी/वाकड : वाकड येथील भूमकर चौकात वाहतूक समस्या बिकट आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भुयारी मार्गापासून मारुंजी वाय जंक्शनपर्यंतची मुख्य लेन बंद करून, सेवा रस्त्याने वाहतूक वळवली आहे. तरीही प्रश्न सुटत नसल्याने लेन पुन्हा सुरू करणे, बंद करणे, बॅरिकेटस् लावून दुभाजकाची लांबी वाढवणे असे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने गुरुवारी (ता. ३०) पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संपर्क साधून, त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यामुळे भूमकर चौक ते कस्तुरी चौक ते विनोदे चौक ते भूमकर चौक अशी एकेरी वाहतूक केल्यास प्रश्न सुटू शकेल, अशी स्थिती आहे.
देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग आणि चिंचवड-हिंजवडी मार्ग यांना छेदणारा वाकडमधील चौक म्हणजे भूमकर चौक. चिंचवड ते हिंजवडी वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाह्यवळण मार्गाखाली महापालिकेने भुयारी मार्ग केला आहे. मात्र, दोन्ही बाजूस सहा पदरी रस्ता व भुयारी मार्ग चौपदरी असल्याने आणि बाह्यवळणच्या सेवा रस्त्याने कात्रजकडून आलेली वाहतूक भुयारी मार्गापासून डावीकडे वळवली आहे. तेथून उजवीकडे यू-टर्न घेऊन भुयारी मार्गाकडे वाहनचालकांना येत आहे. तरीही कोंडी होत असल्याने हिंजवडीकडील मुख्य लेनच पोलिसांनी बंद करून सेवा रस्त्याने वाहतूक वळवली आहे. पुन्हा कोंडी होत असल्याने ती सोडविण्यासाठी ‘सकाळ’ने पाठपुरावा केला. स्थानिकांसह वाहनचालक, पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांची भूमिका मांडली. गुरुवारी पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली.
असे वन-वे केल्यास प्रश्न सुटेल
भूमकर चौक वाय जंक्शन ते कस्तुरी चौक
- भुयारी मार्गापासून वाय जंक्शनपर्यंत बंद केलेली मुख्य लेन खुली होऊन सेवा रस्त्यासह सहा पदरी रस्ता उपलब्ध होईल
- बाह्यवळण मार्गाच्या सेवा रस्त्याने कात्रजकडून येणारी वाहने डावीकडे वळून कस्तुरी चौकापर्यंत जाऊन उजवीकडे वळतील
- हिंजवडीच्या दिशेने कस्तुरी चौकापर्यंत चौपदरी मार्ग उपलब्ध होईल, कस्तुरी चौकातून नियमितपणे वाहने हिंजवडीकडे जातील
कस्तुरी चौक ते विनोदे चौक
- हिंजवडीकडून येणारी वाहने डावीकडे वळून विनोदे चौकातून इच्छित स्थळी जातील
- बाह्यवळण मार्ग, डांगे चौक, भूमकर चौकाकडून येणारी वाहने उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील
- बाह्यवळण मार्ग, डांगे चौक, भूमकर चौक व हिंजवडीकडून आलेली वाहने विनोदे चौकापर्यंत एकाच रस्त्याने जातील
विनोदे चौक ते भूमकर चौक
- मारुंजीकडून येणारी वाहने सरळ भूमकर चौकात जातील, तेथून पुढे बाह्यवळण मार्ग व डांगे चौकात जाता येईल
- कस्तुरी चौकाकडून मारुंजी, कासारसाईकडे जाणारी वाहने डावीकडे वळून पुढे जातील
- कस्तुरी चौकाकडून आलेली वाहने बाह्यवळण मार्ग व डांगे चौकाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळतील
हेही करायला हवे
- भूमकर चौकातील सर्व रस्त्यांच्या पदपथांची उंची वाढविल्यास पादचाऱ्यांची सोय होईल
- रस्ता सहा पदरी असल्याने वाय जंक्शन चौकात सर्व रस्त्यांना जोडण्यासाठी पादचारी पूल उभारायला हवा
- वाय जंक्शनलगतचे प्रस्तावित वाहतूक बेट (ट्रॅफिक वर्तुळ) निर्माण करायला हवे
- रस्त्यांचे रखडलेले भूसंपादन पूर्ण करून प्रस्तावित रस्त्यांचे रुंदीकरण करावे
स्थानिकांना थोडा वळसा
भूमकर चौक वाय जंक्शन ते कस्तुरी चौक, कस्तुरी चौक ते विनोदे चौक व विनोदे चौक ते भूमकर चौक वाय जंक्शन हे मार्ग वन-वे केल्यास वाहतूक सुरळीत होऊ शकते. मात्र, स्थानिक विनोदे चौक ते वाय जंक्शनपर्यंतच्या दरम्यान राहणाऱ्या वाहनचालकांना कस्तुरी चौक व विनोदे चौकातून वळून जावे लागेल. यासाठी एक-दीड किलोमीटरचे अंतर वाढले तरी, वाहतूक कोंडीतून सुटका मात्र होईल. पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर ‘वन-वे’चा निर्णय घेतल्यास व तो
यशस्वी झाल्यास कायम करायला हवा. स्थानिक नागरिकांचेही मत विचारात घ्यायला हवे.
भूमकर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कस्तुरी चौक ते वाय जंक्शन आणि वाय जंक्शन ते विनोदे कॉर्नर हे दोन्ही रस्ते एकेरी करण्याचा विचार सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक केली जाणार आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.
- सुनील पिंजण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85576 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..