
पिंपरी : प्रायोगिक तत्त्वावर १४ जुलैपर्यंत एकेरी वाहतूक
पिंपरी : वाकड येथील भूमकर चौकातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी (ता. १) दुपारपासून तीन रस्त्यांवर वन-वे (एकेरी मार्ग) केला. वाहनचालकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक लावून वाय जंक्शन येथे बॅरिकेड लावले.
चिंचवड ते हिंजवडी मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी भूमकर चौकात देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाखाली महापालिकेने भुयारी मार्ग केला आहे. त्याच्या दोन्ही बाजूस सहापदरी रस्ता आहे. मात्र, भुयारी मार्ग चौपदरी आहे. बाह्यवळणच्या सेवा रस्त्याने कात्रजकडून आलेली वाहतूक भुयारी मार्गापासून डावीकडे वळवली होती. वाय जंक्शन येथून उजवीकडे यू-टर्न घेऊन भुयारी मार्गातून वाहनचालकांना इच्छितस्थळी जावे लागत होते. त्यामुळे कोंडी होत होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी भुयारी मार्गापासून हिंजवडीकडील मुख्य लेन बंद करून सेवा रस्त्याने वाहतूक वळवली होती, तरीही कोंडी होत असल्याने ती सोडविण्यासाठी ‘सकाळ’ने पाठपुरावा केला.
स्थानिकांसह वाहनचालक, पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांची भूमिका मांडली. गुरुवारी (ता. ३०) पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संपर्क साधून, त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यामुळे भूमकर चौक ते कस्तुरी चौक, कस्तुरी चौक ते विनोदे चौक, विनोदे चौक ते भूमकर चौक अशी एकेरी वाहतूक केल्यास प्रश्न सुटू शकेल, अशी उपाययोजना सुचविली होती. वाहतूक पोलिस विभागानेही प्रायोगिक तत्त्वावर १४ जुलैपर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तात्पुरत्या स्वरूपात एकेरी वाहतूक करण्याचा आदेश पोलिस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी काढला आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता. १) सायंकाळपासून एकेरी वाहतूक केली. त्यासाठी वाय जंक्शन चौकात बॅरिकेड लावून यू-टर्न बंद केला असून, बंद केलेली लेन सुरू केली आहे.
...अशी असेल एकेरी वाहतूक
- कस्तुरी चौक ते भूमकर चौक वाय जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना बंदी, त्यांना कस्तुरी चौक ते विनोदे चौक (कॉर्नर) मार्गे वाय जंक्शन असा पर्यायी मार्ग असेल.
- वाय जंक्शन येथील यू-टर्न व विनोदे कॉर्नरकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी, त्यांना वाय जंक्शन ते कस्तुरी चौकातून उजवीकडे वळून विनोदे चौक पर्यायी मार्ग असेल.
‘‘भूमकर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयोग केले आहेत. आता एकेरी वाहतूक केली जाणार आहे. त्यामुळे मार्ग निघू शकतो. डांगे चौकाकडून येणारी वाहने वाय जंक्शन येथून यू-टर्न घेण्याचा प्रश्नच येत नाही. ती वाहने सरळ हिंजवडी वा मारुंजीकडे जातात. यू-टर्न घेणारी वाहने बाह्यवळण मार्गाने आलेली असतात. त्यांच्यासाठी इतरांना वेठीस धरू नये. त्या वाहनांना सरळ कस्तुरी चौकातून विनोदे कॉर्नरमार्गे येऊ द्यायला हवे. मधली लेन बंद करू नये, शिवाय वाहतूक पोलिस व ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करायला हवी, अशी वेळोवेळी आम्ही मागणी केली आहे.’’
- सागर भूमकर, स्थानिक रहिवासी, वाकड
‘‘भूमकर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कस्तुरी चौक ते वाय जंक्शन आणि वाय जंक्शन ते विनोदे कॉर्नर हे दोन्ही रस्ते प्रायोगिक तत्त्वावर बंद केले आहेत. त्यांना पर्यायी मार्ग दिले आहेत. तसेच, वाय जंक्शन येथील यू-टर्न बंद केला आहे. एकेरी वाहतूक मार्गाबाबतच्या सूचना नागरिकांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखेकडे १४ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. त्या विचारात घेऊन अंतिम आदेश काढण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक केली जाणार आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.’’
- आनंद भोईटे, पोलिस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85822 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..