
मतदार यादी हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत द्या खासदार श्रीरंग बारणे यांची महापालिकेकडे मागणी
पिंपरी, ता. १ : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागानुसार फोडण्यात आलेल्या मतदार याद्यांची विभागणी प्रभाग रचनेला अनुसरून झालेली नाही. नावे दुसऱ्या प्रभागांमध्ये चुकीच्या पद्धतीने जोडली आहेत. मतदार यादीतील मतदारांची नावे शोधण्यासाठी दिलेला अवधी खूपच कमी पडत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला विनंती करून हरकती नोंदविण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ मिळवून घ्यावी, अशी सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना बारणे यांनी निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महापालिका निवडणूक शाखेने पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या २३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १ जुलै २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रारुप मतदार याद्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी केवळ ८ दिवसांचा वेळ मिळाला आहे. हा कालावधी खूप कमी आहे.
प्रभागानुसार फोडण्यात आलेल्या मतदार याद्या परिपूर्ण प्रभाग रचनेला अनुसरून विभागणी केलेली नाही, असे निदर्शनास येत आहे. सर्व प्रभागांमधील दीड ते अडीच हजार नावे मूळ प्रभागांमध्ये न राहता दुसऱ्या प्रभागांमध्ये चुकीच्या पद्धतीने जोडली आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतील मतदारांची नावे शोधण्यासाठी संभाव्य उमेदवारांना व मतदारांना हरकतीसाठीचा अवधी खूपच कमी पडत आहे, असे खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m85829 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..