
रूग्णालयातील दरवाढीचा प्रस्ताव मागे घ्या
पिंपरी, ता.२२ ः वैद्यकीय सेवा सुविधा व औषधोपचाराच्या दरवाढीचा प्रस्ताव मागे घ्या, विद्यार्थ्यांसाठीचे शालोपयोगी साहित्य खरेदी पारदर्शक पद्धतीने तातडीने वाटप करावे, अशी मागणी नागरी समस्या निवारण समितीने महापालिका प्रशासक राजेश पाटील यांना भेटून केली. त्यावेळी प्रस्तावाबाबत फेरविचार करू, तसेच शैक्षणिक साहित्य लवकर देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.
समितीने निवेदनात म्हटले आहे, ‘‘गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेच्या ८ रुग्णालय व २९ दवाखान्यातून अल्प दरात उपचार मिळतात. मात्र, सुधारित दर लागू करण्याचा अन्यायकारक निर्णय आहे. यामुळे दुपटीने दरवाढ होणार आहे. तसेच महापालिका शाळांमधील ४० हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिक्षण विभागामार्फत पाठ्यपुस्तके, गणवेश, पी.टी. गणवेश, स्वेटर, रेनकोट, बूट-सॉक्स, दप्तर-कंपास, वह्या असे साहित्य मोफत दिले जाते. मात्र, यावर्षी लोकनियुक्त नगरसेवक व महापालिका पदाधिकारी नसल्यामुळे निविदेचा वाद आणि टक्केवारीचा गोंधळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना तातडीने साहित्य पुरवावे, अन्यथा सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांना एकत्रित आणून तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’
शिष्टमंडळासोबत आयुक्तांची खडाजंगी
प्रशासक म्हणून नागरिकांसाठी जाचक आणि त्रासदायक निर्णय घेण्यात येत आहेत. लोकनियुक्त पदाधिकारी सभागृहात निर्णय घेतील, अशी जनतेची बाजू समितीचे सदस्य मारुती भापकर यांनी मांडली. त्यावर पाटील यांनी मी प्रशासक आहे, मला अधिकार आहेत, असे त्यांनी सुनावले. त्यावर भापकर यांनी करदात्यांनादेखील विशेष अधिकार असल्याचे ऐकवले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22o44313 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..