
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात मिळणार पुस्तके
पिंपरी - यंदा १३ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. त्यानुसार महापालिकेने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने समग्र शिक्षण अभियानांतर्गत बालभारतीकडे पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मागणी केली होती़. त्यानुसार बालभारतीने महापालिकेला ८८ हजार ५९६ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला आहे.
शासनातर्फे समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यामध्ये मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या अनुदानित शाळांचा समावेश असतो. महापालिका शिक्षण विभागाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी बालभारतीकडे एक लाखाची पुस्तकांची मागणी केली होती. जून महिन्यात शालेय शैक्षणिक वर्षास सुरुवात होत असते. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या पिंपरी आणि आकुर्डीच्या शहर साधन केंद्रावर दाखल होत असतात.
दरवर्षी ही पुस्तके जूनच्या पहिल्या आठवड्यातच शिक्षण विभागाकडे सोपविली जातात. यंदा बालभारतीकडून मे महिन्यातच पाठ्यपुस्तके मिळाली आहेत. शासनाकडून शहरातील शहर साधन केंद्रात पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. आकुर्डी व पिंपरी केंद्रावर पुस्तके दाखल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात दिली जातात. जेणेकरून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत नवीन पुस्तक देऊन केले जाईल, अशी माहिती विषयतज्ज्ञ प्रदीप शिंदे यांनी दिली.
शिक्षण विभागाच्या मागणीनुसार बालभारतीकडून महापालिकेच्या पिंपरी आणि आकुर्डीच्या शहर साधन केंद्रावर पुस्तके दाखल केल्यावर (ता. २५) पासून २० केंद्रावरून ती वितरित करण्यात येतील. शाळेच्या पहिल्या दिवशीच मुलांच्या हातात पुस्तके मिळतील, असे नियोजन केले आहे.
- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, प्राथमिक विभाग महापालिका
माध्यम (इयत्ता निहाय) पहिली-दुसरी-तिसरी-चौथी-पाचवी-सहावी-सातवी-आठवी - एकूण
मराठी माध्यम -४१२७-६६६०-७६०८-१०२६७-११४४३-१२०९१-१२७३९-१२५५२-७७४८
उर्दू माध्यम - ३१३ - ३१३ -३१३- ४१८- ४८६- ५७७- ५३२- ५८५- ३५३७
हिंदी माध्यम -७९- १५७- १९५- २९४- ३३७- ३७९- ३३७- ३४२- २१२०
इंग्रजी माध्यम -५०७-५६७-५६७ -५५३-६८०-५८६-९९६-९९६-५४५२
एकूण -५०२६-७६९७-८६८३-११५३२-१२९४६-१३६३३-१४६०४-१४४७५-८८५९६
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05512 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..