
उन्हाळी संस्कार शिबिरांना उधाण मुलांना बाहेर पडून सुट्टी ‘एन्जॉय’ करण्याची संधी; नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार
पिंपरी, ता. २४ ः सलग दोन वर्षांपासून मोठ्या संख्येने होणाऱ्या उन्हाळी संस्कार शिबिरांना ‘लॉकडाउन’मुळे ब्रेक लागला होता. पण, आता कोरोनाची निवळल्यामुळे उन्हाळी संस्कार शिबिरांना उधाण आले आहे. परिणामी मुलांना बाहेर पडून सुट्टी ‘एन्जॉय’ करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना या शिबिरातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये सुट्टी व संस्कार शिबिरे हे जणू समीकरणच बनले आहे. दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीच्या काळात काही मुले नियमित शिबिरांना जात असतात. दरवर्षी वार्षिक परीक्षा संपली की येणारी सुट्टी कशी घालवायची, असा प्रश्न मुलांसह पालकांसमोरही असतो. पूर्वी सुट्टीच्या दिवसांत मामाच्या गावाला किंवा आपल्या स्वत:च्या गावी जाण्याचा तसेच पर्यटनाचा बेत अनेक जण आखायचे. मात्र, हल्ली मामाच्या गावाला किंवा स्वतःच्या गावी जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पर्यटनाला जाणेही अनेक जण टाळतात. पर्यायाने मुलांचा वेळ सत्कारणी लागावा, यासाठी कला आणि क्रीडा प्रकारातील विविध शिबिरे पालकांच्या डोळ्यांसमोर येतात. अगदी नृत्य, गायन, चित्रकला यापासून ते थेट क्रिकेट, बुद्धिबळ, ट्रेकिंग आदी प्रकारची शिबिरे या काळात आयोजित केली आहेत. सुट्टीमध्ये शिबिरांना मुलांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, मागील काही वर्षांत व्यावसायिक शिबिरांचे प्रमाणही मोठ्या संख्येने वाढले आहे. पालकही सुट्टीत विरंगुळा म्हणून मुलांना शिबिर, तसेच छंदवर्गांना पाठवतात. अशा शिबिरांमधून अनेक गोष्टी मुले शिकतात.
प्रतिसाद काही प्रमाणात कमी
कोरोना काळात मोबाईलच्या दुनियेत गुंतलेल्या मुलांना यामुळे मैदानावर येण्याचे प्रोत्साहन मिळेल. नवीन मित्रमंडळीशी भेटीगाठी झाल्यावर त्यांचा मानसिक विकासदेखील होतो.
पण, पूर्वीच्या तुलनेत शिबिरांना मिळणारा प्रतिसाद काही प्रमाणात कमी झाला आहे. याकरिता विविध बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. उन्हाळी शिबिराला आधीसारखा प्रतिसाद मिळत नाही. उन्हाळ्यातदेखील शाळा सुरू असणे, कोरोनामुळे मुलांची बाहेर खेळण्याची सवय तुटणे या सर्वांचा परिणाम यावर्षी दिसत आहे.
किमतीत तिपटीने वाढ
उन्हाळी शिबिराच्या खर्चात वाढ झाल्यानेदेखील निरुत्साह असल्याचे चित्र आहे. विशेषतः: निवासी शिबिरांना महागाईचा मोठा फटका बसलेला आहे. त्यांच्या फीमध्ये दुपटीने किंवा तिपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खाद्यपदार्थ आणि इंधनाचे दर वाढले असताना आधीच्या खर्चात शिबिरांचे आयोजन कठीण झाले असल्याचे एका उन्हाळी शिबिराच्या आयोजकाने सांगितले.
शहरात उन्हाळी शिबिरांचा मोसम सुरू झाला आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे ही शिबिरे होऊ शकली नव्हती. मात्र, आता पुन्हा एकदा पालक आणि विद्यार्थी यांच्यात शिबिरांबद्दलचा उत्साह पुन्हा एकदा दिसून येत आहे. कला आणि क्रीडा प्रकारातील विविध शिबिरामुळे ते बाहेरच्या जगाशी जुळतात.
- युसूफ शेख, डार्करूम स्टुडिओ
कोरोना काळात मोबाईलच्या दुनियेत गुंतलेल्या मुलांना यामुळे मैदानावर येण्याचे प्रोत्साहन मिळेल. नवीन मित्रमंडळीशी भेटीगाठी झाल्यावर त्यांचा मानसिक विकास देखील होईल. दोन वर्षांनंतर उन्हाळी शिबिर होत असल्याने मुलांपेक्षा पालकांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे.
- प्रतीक्षा इंगळे, संचालक प्रतीक्षा इन्स्टियूट
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05531 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..