
तीन सदस्यीय प्रभागामुळे पुरुषांना धाकधूक महापालिका निवडणूक ः महिलांसाठीच्या सोडतीत ४६ पैकी २४ प्रभागांत मिळणार एकच जागा
पिंपरी, ता. २५ ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पन्नास टक्के राजकीय आरक्षणानुसार महापालिका निवडणुकीसाठी १३९ पैकी ७० जागा महिलांसाठी आरक्षित होतील. मात्र, तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक होणार असल्याने ४६ प्रभाग निश्चित आहेत. त्यातील ७० जागांची आरक्षण सोडत मंगळवारी (ता. ३१) काढली जाणार आहे. त्यामुळे २४ प्रभागातील तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित होतील. हे २४ प्रभाग सोडतीनंतर निश्चित होणार असल्याने ते कोणते? याची उत्सुकता असून, इच्छुक पुरुषांची धाकधूक वाढली आहे.
महापालिका निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना गेल्या आठवड्यात जाहीर केली. आता अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व सर्वसाधारण महिलांसाठी मंगळवारी सोडत काढली जाणार आहे. त्या सोडतीवर निवडणूक लढविण्याचे गणित ठरणार आहे. माजी नगरसेवकांवर अन्य इच्छुकांनीही निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. मात्र, नियोजित वेळेनुसार १३ मार्च रोजी महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक न झाल्याने ती केव्हा होणार? शिवाय, राज्य सरकारने कायदा करून निवडणूक घेण्याबाबत स्वतःकडे घेतलेले अधिकार व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे संपुष्टात आलेले आरक्षण, या बाबी न्यायप्रविष्ट होत्या. त्यामुळे निवडणुकीबाबत अनिश्चितता होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केल्याने सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी एससी, एसटी व सर्वसाधारण गटातील महिलांसाठीचे ५० टक्के आरक्षण कसे पडते? याची प्रतिक्षा आहे.
२०१२ व २०१७ ला निम्मे-निम्मे
महापालिकेची २०१२ ची निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने आणि २०१७ ची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. त्यावेळी अनुक्रमे ६४ व ३२ प्रभाग होते. २०१२ ला पन्नास टक्के आरक्षणानुसार ६४ प्रभागातील दोनपैकी प्रत्येकी एक जागा आणि २०१७ ला ३२ प्रभागातील चारपैकी प्रत्येकी दोन जागा महिलांसाठी राखीव होत्या. त्यामुळे प्रत्येक प्रभागात महिला व पुरुषांसाठी समान अर्थात निम्मे-निम्मे जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सरळ-सरळ लढती झाल्या.
आता तीन तिघडा; काम बिघडा
महापालिकेची २०२२ ची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. त्यासाठी प्रभाग रचना झाली आहे. शिवाय, लोकसंख्येच्या प्रमाणात ११ जागा वाढविल्याने २०१२ व २०१७ च्या १२८ ऐवजी १३९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. दोन्ही वेळच्या जागांचा आकडा समान होता. त्यामुळे समसमान जागा मिळाल्या. आता विषम संख्या असल्याने पूर्णांक सूत्रानुसार एक जागा महिलांना अधिकची असेल. शिवाय, ४६ पैकी २४ प्रभागांतील तीनपैकी दोन जागा महिलांसाठी व एक जागा पुरुषांसाठी असेल.
खुल्या जागांवरही लढतील महिला
महापालिका निवडणुकीसाठी १३९ पैकी ६९ जागा पुरुषांसाठी मिळतील. पण, ४६ पैकी २४ प्रभागांत दोन महिला व एक पुरुष असेल. मात्र, त्या एका जागेसह उर्वरित २२ प्रभागांतील तीनपैकी दोन जागा खुल्या असतील. त्यामुळे त्या जागांवरसुद्धा महिलांना निवडणूक लढविता येणार आहे. त्या प्रभागांमध्ये पुरुष विरुद्ध महिला अशा लढती होऊ शकतील. २०१२ मध्ये निगडी प्रभाग ११ व मोहननगर प्रभाग २६ मधील प्रत्येकी दोन्ही जागांवर महिलाच विजयी झाल्या होत्या. त्यामुळे १२८ पैकी ६६ महिला व ६२ पुरुष सदस्य होते.
---
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05984 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..