
देशातील वैज्ञानिकसुद्धा स्वातंत्र्ययोद्धे ः सगदेव
पिंपरी, ता. ३१ ः ‘‘भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा संघर्षाचा, अतुलनीय त्यागाचा आणि शौर्याचा आहे. भारतीय वैज्ञानिक हेदेखील स्वातंत्र्ययोद्धे आहेत,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कार्पोरेट ट्रेनर सतीश सगदेव यांनी केले.
मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यातर्फे आकुर्डी प्राधिकरणातील संजय काळे क्रीडांगणावर आयोजित मधुश्री व्याख्यानमालेत ‘भारतीय स्वातंत्र्यलढा आणि विज्ञान’ या विषयावर सगदेव बोलत होते. यावेळी व्याख्याते राजेंद्र घावटे, मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक, सचिव राजेंद्र बाबर, सलीम शिकलगार उपस्थित होते.
सगदेव म्हणाले, ‘‘औद्योगिक क्रांतीमुळे ब्रिटिशांची वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली आणि त्यांनी भारतात प्रवेश केला. येथील अफाट साधनसंपत्ती पाहून त्यांनी सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांचे सर्वेक्षण केले. यासाठी भारतीयांना कनिष्ठ पदांवर सामावून घेतले. जंगलतोड करून नीळ, ऊस, चहा यांची लागवड केली. साधनसंपत्तीची सुलभपणे लूटमार करता यावी म्हणून रेल्वे, पोस्ट अँड टेलिग्राम या सुविधा निर्माण केल्या. त्यामुळे मूठभर उच्चशिक्षित भारतीयांच्या मनांत ब्रिटिशांविषयी कृतज्ञता निर्माण झाली. महेंद्रलाल सरकार यांना ब्रिटिशांच्या कुटनीतीचा प्रत्यय आल्यावर त्यांनी कलकत्ता मेडिकल जर्नल्सच्या माध्यमातून विज्ञान प्रसाराला प्रारंभ केला. स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, जगदीशचंद्र बसू, प्रफुल्लचंद्र रॉय, प्रमथनाथ बसू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला. जमशेदजी टाटा यांच्या साहाय्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था स्थापन केली. त्यामुळे मेघनाद सहा, सत्येंद्र बसू असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक वैज्ञानिक निर्माण झाले. ज्या विज्ञानाच्या साहाय्याने ब्रिटिशांनी भारतावर वर्चस्व प्रस्थापित केले; त्याच विज्ञानाचा आधार घेऊन भारतीय वैज्ञानिकांनी त्यांच्या वर्चस्वाला हादरा दिला. त्यामुळे भारतीय वैज्ञानिक हेदेखील स्वातंत्र्ययोद्धे आहेत.’’
उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष चांदबी सय्यद यांनी प्रास्ताविक केले. रमेश वाकनीस आणि चंद्रशेखर जोशी यांनी परिचय करून दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22t20384 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..