
निर्ढावलेली यंत्रणा आणि ढिम्म कारभार
पिंपरी, ता. १८ : मावळ तालुक्यातील कार्ला, पाटण परिसरात जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. तर, या परिस्थितीचा गैरफायदा घेत परिसरात टँकर माफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या प्रशासकीय यंत्रणेसह या भागातील लोकप्रतिनिधीच टँकर माफियांच्या पाठीशी आहेत. ‘कुंपणानेच शेत खाल्ले, तर जाब कोणाला विचारायचा?’ अशी परिस्थिती येथे दिसून येत आहे.
लोणावळा-कार्ला परिसरात पर्यटनामुळे हॉटेल, लॉजिंग-बोर्डिंग, भक्त निवास, गृहनिर्माण संस्था व अन्य संस्था मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कार्ला, पाटण परिसरातील १७ गावे व सुमारे ३० वाड्या-वस्त्यांच्या परिसरात अपुरा व अनियमित पाणी पुरवठा होत आहे. हीच परिस्थिती वडगाव मावळ तालुक्यातील अन्य मोठी शहरे व गावांमध्ये आहे. कार्ला व पाटण प्रादेशिक पाणी नळ योजना यांचा अनुक्रमे २००६ व २०१२ मध्येच कार्यकाळ संपलेला आहे. जे पाणी मिळते त्याचेही वितरण व्यवस्थित होत नाही. टँकर माफियांचा गोरखधंदा होण्यासाठी जाणून-बुजून पाणीच सोडले जात नाही. तसेच अवघ्या तासभर जे सोडले जाते तेही गढूळ असते. त्यामुळे नागरिकांना व व्यावसायिकांना नाइलाजास्तव टँकर मागवावे लागतात. १२०० ते १३०० रुपयांना एक टँकर मिळतो. दिवसभरात असे शेकडो टँकर खेपा टाकतात व लाखोंची लुट करतात.
टँकर माफियांच्या दररोजच्या लाखो रुपयांच्या लुटीची टक्केवारी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाणी योजना, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत जात आहे. त्यामुळेच ते या माफियांकडे डोळेझाक करून काहीच कारवाई करत नाहीत का?, असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या पाणी समस्येस जबाबदार अधिकारी, पदाधिकारी व यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांना दुजोरा मिळत आहे. भ्रष्ट यंत्रणेमुळे प्रशासकीय अधिकारी सुस्त असून माफिया मुजोर झाले आहेत. टँकर माफिया व प्रशासकीय यंत्रणेच्या भ्रष्ट संगनमतामुळे अधिकारी इतके निर्ढावले आहेत, की कोणी याबाबत आवाज उठविला तरी ते त्याकडे दुर्लक्ष करतात.
टँकर लॉबीत सर्वपक्षीय सहभाग
कार्ला, वेहेरगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचेच टँकरचे व्यवसाय आहेत. हीच परिस्थिती तालुक्यातील सर्व शहर व गावांमध्ये आहे. एकतर सरपंच, उपसरपंच यांचे जवळचे नातेवाईक किंवा राजकीय लागेबांधे असलेली व्यक्तीच टँकर लॉबीचे काम करत आहे. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी आहेत. त्यामुळे ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी परिस्थिती संपूर्ण मावळ तालुक्यात आहे.
वळवण धरणाच्या पाझर ओढ्यातून पाणी चोरी;
- राज्याचा जलसंपदा विभाग मात्र सुस्त!
टाटा समूहाचे वळवण धरण आहे. कार्ला आदी योजनांना याच धरणातून पाणी पुरवठा होतो. टँकर माफिया इंद्रायणी नदीतून, कधी खासगी विहिरीतून, कधी बोअरवेलमधून पाणी उचलतात. परंतु सर्रास टँकर माफिया वळवण धरणाचा पाझर जेथे वाहून जातो त्या पुणे-मुंबई महामार्गावरील वर्सुली गावाजवळील ओढ्यातून उचलतात. हा ओढा इंद्रायणी नदी नैसर्गिक असल्याने या राष्ट्रीय संपत्तीचीच चोरी हे लोक करत आहेत. परंतु, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर आमच्याकडे कोणी तक्रार केली तर आम्ही कारवाई करु असे निर्ढावलेपणाचे वक्तव्य करतात. आपत्कालीन परिस्थितीत सरकार खासगी विहिरीही ताब्यात घेवून जनतेला पाणी पुरवठा करत असते. मग येथे राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणा गप्प का आहेत?
आमदार शेळके टँकर माफियांना वेसन घालणार का?
कार्ला, पाटण परिसरातील अपुरा व अनियमित पाणी पुरवठ्याबाबत ‘सकाळ’ने सविस्तर वृत्त दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी संबंधित विभागांचे प्रशासकीय अधिकारी व आजी-माजी लोकप्रतिनिधींची बैठक बोलविली असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. मावळ तालुक्यातील कुठल्या भागात कमी पाणी जाते, याचा आढावा घेताना पाणी योजनांना कुठे निधी कमी पडतोय तेथे सुधारणा
करण्याचा त्यांचा मानस असल्याचे समजते. परंतु टँकर माफियांना ते वेसण घालणार का? असा प्रश्न मावळातील राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22y11509 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..