मुळा, पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळा, पवना नद्यांच्या 
पाणी पातळीत वाढ
मुळा, पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

मुळा, पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः मुळशी व मावळ तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे व धरणांतून केलेल्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा व पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दोन्ही नद्या दुथडी भरून वाहात आहेत.
मुळा नदीवर मुळशी धरण असून पवना नदीवर पवना धरण आहे. दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व धरणाच्या खालील बाजूस गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यापूर्वीच दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे मुळा धरणातून दोन हजार व पवना धरणातून साडेतीन हजार क्युसेकप्रमाणे विसर्ग सुरू होता. बुधवारी सायंकाळपासून पवनातील विसर्ग चौदाशेपर्यंत कमी करण्यात आला. मात्र, मुळशी धरणातून गुरुवारी (ता. १५) सकाळी नऊपासून विसर्ग वाढवण्यात आला. दोन हजाराऐवजी पाच हजार ६५८ क्युसेकप्रमाणे विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार त्यात बदल संभवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन मुळशी धरणप्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे.
मुळा व पवना नद्यांच्या संगम जुनी सांगवी येथे होतो. दोन्ही नद्यांच्या मध्ये सांगवी असून एका बाजूला दापोडी व दुसऱ्या बाजूला पुण्यातील बोपोडी उपनगर आहे. दोन्ही धरणातून केलेला विसर्ग व धरणाच्या खालील बाजूस असलेले नाले, ओढ्यांच्या पाण्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे संगमावर पाण्याचा फुगवटा होऊन त्याचा मोठा फटका सांगवीतील ममतानगल, संगमनगर, पवनानगर, मुळानगर, मधुबन सोसायटी, दापोडीतील सिद्धार्थनगर, पवारनगर आदी भागाला बसतो. या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. धरणातून विसर्ग केलेला असला तरी, नद्यांच्या पात्रालगतच पाणी आहे. नागरी वस्तीत पाणी शिरण्याची शक्यता कमी आहे. या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y25387 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..