शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या
शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या

शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या आहेत. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परिणामी, एकेका शाळेवर १५ ते २० वर्ष ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांची मक्तेदारी वाढली आहे. दरम्यान, एक महिन्यापासून निव्वळ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची चर्चा रंगली असून, प्रत्यक्षात बदली होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महापालिका शिक्षकांच्या बदल्या या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादग्रस्त ठरतात. २०१८ पासून तत्कालीन आयुक्तांनी परिपत्रक काढून प्रशासकीय बदली प्रक्रिया कशी राबवावी, याचा निर्णय दिलेला आहे पण प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या तीन वर्षापासून निव्वळ बदल्यांसंदर्भात परिपत्रक काढले जात आहेत. प्रत्यक्षात यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया राबवली जात नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सोनवणेवस्ती शाळेला चार वर्षापासून प्रभारी मुख्याध्यापकच आहे. त्याप्रमाणेच बऱ्याच शाळेत शिक्षक संख्या कमी आहेत, तर काही ठिकाणी शाळेत अतिरिक्त शिक्षक आहेत. २१ शाळा मुख्‍याध्यापिकाविना असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.


बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची मक्तेदारी
तीन वर्षाच्या निकषांनुसार केवळ ३० टक्के बदलीपात्र शिक्षकांची संख्या ३०० हून अधिक आहे. प्रशासनाने या शिक्षकांची यादी तयार करणे आवश्‍यक आहे. अनेक शाळांमध्ये तीन, पाच व १५ वर्ष झालेल्या शिक्षकांची मक्तेदारी वाढलेली आहे. बायोमेट्रिक हजेरी लावतात आणि गायब होतात. त्याचा थेट परिणाम शाळेच्या गुणवत्तेवर झाला आहे. शिक्षक बदलल्याशिवाय शाळा सुधारणार नाहीत, असा पूर्वानुभव आहे. परंतु तीन वर्षांपासून बदल्या होत नसल्याने काही शिक्षकांचे चांगलेच फावले आहे. या निकषानुसार तरी बदल्या करायला हव्यात, अशी मागणी शिक्षक करू लागले आहेत.


विनंत्या बदल्याही होईनात
विनंत्या बदल्यांसाठी शिक्षकांचे वैयक्तिक अथवा वैद्यकीय कारणास्तव बदली होते. याबाबत तत्कालीन प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी ६ जानेवारी २०२१ मध्ये परिपत्रक काढून इच्‍छुक शिक्षकांची माहिती मागवली होती. गेल्या काही वर्षापासून बदल्यांची प्रक्रिया न झाल्यामुळे अनेक शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. २०१७-१८ मध्ये झालेल्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या किंवा चुकीने दूरच्या ठिकाणी नियुक्ती झालेल्या शिक्षकांना सामावून घेण्यात येणार होते. शिक्षकांनी मुख्याध्यापक व विभागीय पर्यवेक्षकांच्या शिफारशीने अर्ज सादर केले. बदलीचा निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण ती फोल ठरली आहे. त्यानुसार तीन वर्षात कार्यवाही सुरु झाली नाही. विनंती बदल्या आणि वैद्यकीय बदल्यांसाठी शिक्षक धडपड करत आहेत.

शिक्षकांच्या बदल्या कधी?
मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्रशासनाधिकारी या सर्वांचे बदल्या होत आहेत. मग शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक का लावला आहे. शासन ही आता विनंती बदली, प्रशासकीय बदली, पदोन्नतीसाठी सकारात्मक आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांच्या बदल्या होत आहेत. मग महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांच्या का होत नाहीत, असा प्रश्‍न प्रामाणिक शिक्षकांना पडला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27634 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..