महापालिकेच्या बोपखेल शाळेला जागतिक नामांकन इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत तृतीय स्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या बोपखेल शाळेला जागतिक नामांकन
इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत तृतीय स्थान
महापालिकेच्या बोपखेल शाळेला जागतिक नामांकन इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत तृतीय स्थान

महापालिकेच्या बोपखेल शाळेला जागतिक नामांकन इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत तृतीय स्थान

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल इंग्लंडमधील टी फॉर एज्युकेशन संस्था जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कार देते. त्यातील ‘समुदाय सहयोग’ (कम्युनिटी कोलॅबोरेशन) श्रेणीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल शाळेने पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळवले आहे. अशी कामगिरी करणारी महापालिकेची ती देशातील पहिली शाळा ठरली आहे. या संस्थेतर्फे अडीच लाख अमेरिकन डॉलर बक्षिस म्हणून देण्यात येणार असून, पहिल्या पाच शाळांमध्ये ते विभागून दिले जाणार आहे.
तीन बाजूने लष्करी हद्द आणि एका बाजूने मुळा नदीने वेढलेले गाव म्हणजे पिंपरी-चिंचवडचे बोपखेल उपनगर. गावठाण, वाड्या, वस्त्या अशी रचना. त्यात दापोडीला जोडणारा रस्ता सात वर्षांपूर्वी लष्कराने बंद केलेला. अशी अडचणीची स्थिती असल्याने गावातील महापालिकेच्या शाळेऐवजी खासगी शाळेकडे पालकांचा ओढा. मात्र, येण्या-जाण्याची गैरसोय. त्यावर उपाय म्हणून स्थानिक स्तरावरच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, महापालिकेच्या शाळेत पालकांनी मुलांना दाखल करावे, शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल उचलले. आकांक्षा फाउंडेशनला शाळा चालवायला दिली. त्यांनी इंग्रजी माध्यमातून धडे द्यायला सुरवात केली. सर्व सुविधा मुलांना मिळू लागल्या. गुणवत्ता वाढली आणि अवघ्या सहा वर्षांच्या वाटचालीत शाळेचा अर्थात ‘पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल बोपखेल’चा लौकिक जागतिक पातळीवर पोहोचला. जूनमध्ये झालेल्या पहिल्या फेरीत शाळेचे स्थान जागतिक स्तरावर प्रथम दहा शाळांमध्ये होते.

शाळेची वैशिष्ट्ये
- बोपखेलमधील वाड्या, वस्त्या, झोपडपट्टीतील विद्यार्थी
- ज्युनिअर केजीपासून दहावीपर्यंतचे वर्ग
- मुलांना मोफत प्रवेश
- मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, दरमहा बैठक
- पालक, विद्यार्थी, समाजासाठी आरोग्य जागृती शिबिरे
- शाळा व्यवस्थापन, विद्या, परिवहन, पोषण आहार समित्यांमध्ये पालकांचा सहभाग

दृष्टिक्षेपात बोपखेल शाळा
विद्यार्थी ः ३१६
शिक्षक ः २५

शाळेतील वातावरण छान आहे. आम्ही टॅबवर अभ्यास करतो. विविध खेळ आम्ही खेळतो. गणित, विज्ञान, भाषा विषय मला खूप आवडतात.
- आदिरा कोरडे, विद्यार्थिनी

मुलांच्या प्रगतीत शाळेने पालकांना सहभागी करून घेतले. दर आठवड्याला पालकांची बैठक शाळेत बोलावली जाते. त्यात पालकांचाही वर्ग घेतला जातो. अभ्यास कसा घ्यायचा, हे त्यात सांगितले जाते.
- प्रीती कोरडे, पालक

शाळेत पालक व शिक्षकांचा सहभाग असतो. मुलांसमवेत पालकांची बैठक घेतो. वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. पुढील पंधरा दिवसांत काय शिकवणार, याची माहिती पालकांना दिली जाते.
- अर्चना जाधव, शिक्षिका

स्पर्धेच्या ‘कम्युनिटी कोलॅबोरेशन’ विभागात आम्ही सहभाग घेतला. पालकांसोबत आम्ही काम करतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवितो. त्यात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
- सुषमा पठारे, मुख्याध्यापिका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27995 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..