
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या स्तोत्रपठण स्पर्धेत ‘रामतांडव’ प्रथम
पिंपरी, ता. २५ ः क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महिला सांघिक स्तोत्रपठण स्पर्धेत ‘रामतांडव’ स्तोत्राच्या सांघिक सादरीकरणाला रोख पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक प्रदान करून गौरवण्यात आले.
प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात कार्यक्रम झाला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सदस्य आसाराम कसबे, डॉ. नीता मोहिते, महिला विभागप्रमुख सुनीता शिंदे आदी उपस्थिती होते. संस्कृत, मराठी आणि हिंदी यापैकी एका भाषेची निवड करून अठरा वर्षांवरील महिलांसाठी सांघिक स्तोत्रपठण स्पर्धा झाली. एका संघात किमान बारा आणि कमाल पंधरा स्पर्धकांचा सहभाग हे निकष होते. सोळा संघांच्या माध्यमातून २९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक व्यंकटेश सुप्रभातम्, तृतीय क्रमांक महिषासुरमर्दिनी, उत्तेजनार्थ कनकधारा, शिवतांडव, विष्णुसहस्त्रनाम यांनी पारितोषिक पटकावले. रोख रक्कम, प्रशस्तिपत्र देऊन विजेत्यांना गौरविण्यात आला. आमदार उमा खापरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नरेंद्र कुलकर्णी, अरुंधती देशमुख, भारती कुलकर्णी आणि सोपान गोंटला यांनी परीक्षण केले. योगिश्वरी महाजन यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली शिंदे यांनी आभार मानले.
--