पहिल्या दिवसापासूनच नवरात्रीची धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या दिवसापासूनच नवरात्रीची धूम
पहिल्या दिवसापासूनच नवरात्रीची धूम

पहिल्या दिवसापासूनच नवरात्रीची धूम

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ ः कधी जोरदार तर कधी संततधार पावसामुळे दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा आनंद काहीअंशी हिरावला होता. अनेकांच्या उत्साहावर पाणी फिरले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोमवारी रात्री अनेक भागात गरबा व दांडियाची धूम दिसून आली. बालगोपाळांसह तरुणाईचा मोठा उत्साह बघायला मिळाला.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या सावटानंतर यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा झाला. मात्र, संपूर्ण उत्सव काळात पावसाने कधी जोरदार तर कधी रिमझिम हजेरी लावली. त्यामुळे उत्सवाचा आनंद घेण्यावर अप्रत्यक्ष निर्बंध आली होती. इच्छा असूनही अनेक जण घराबाहेर पडले नाहीत. गणेशोत्सवानंतर अर्थात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्याचा उत्साह नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शहरात बघायला मिळाला. देवीच्या मंदिरांसह सार्वजनिक मंडळे व महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी आयोजित केलेल्या गरबा व दांडिया कार्यक्रमांना अनेकांनी हजेरी लावली. लहान मुलांसह मोठ्यांनीही रात्री उशिरापर्यंत गरबा व दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.

ग्रामदेवतांचा उत्सव
शहरातील दापोडी, कासारवाडी, सांगवी, आकुर्डी, निगडी, मोरवाडी, खराळवाडी, दिघी, वडमुखवाडी आदी भागात फिरंगाई, शितळाई, काळूबाई, मोरजाई, पद्मावती, खराळआई अशा ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. निगडी दुर्गा टेकडीवरील दुर्गा देवी, आकुर्डी व पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी, चऱ्होलीतील हिरामाता प्रकट झाल्या असल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. शिवाय, नव्याने विकसित झालेल्या भागात वेगवेगळ्या देवींची मंदिरे उभारली आहेत. यात पिंपरी व इंद्रायणीनगरमधील वैष्णवदेवी, यमुनानगर सातेरीदेवी, कुंदननगरची आईमाता, नेहरूनगरची संतोषी माता, अजमेरा कॉलनीतील आईअंबा, चिंचवडची कालिकामाता मंदिरांचा समावेश आहे. या मंदिरांमध्ये घटस्थापना केलेली असून मंदिरांवर रोषणाई केली आहे. महाआरती, भजन, भक्तिगीते, जागर, गोंधळांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. अनेक ठिकाणी गरबा व दांडियांचे आयोजन केले आहे.

इच्छुकांची फ्लेक्सबाजी
महापालिका निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. ती लढवण्याची तयारी अनेकांनी केली आहे. त्यासाठी नवरात्रीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अनेकांनी निवडला आहे. मोकळ्या जागा, मैदाने, अर्धवट रस्ते अशा ठिकाणी गरबा-दांडियांचे आयोजन करून स्वागत कमानी उभारून त्या माध्यमातून फ्लेक्सबाजी केली आहे. काहींनी बक्षिसेही ठेवले आहेत. यात उत्कृष्ट नृत्य, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट जोडी यांचा समावेश आहे. ‘उत्सवाचे सर्व दिवस सहभागी होणाऱ्यांना विशेष बक्षीस व सन्मान’ अशी ऑफरही केली आहे.
---