
पाहुण्यांचे स्वागत
असे पाहुणे येती......
काळ ः सोकावलेला
वेळ ः बरी नसलेली
स्थळ ः किमान शब्दांत, कमाल अपमान करून मिळणारे घर.
ऐन दुपारच्या वेळी बेल वाजली. अब आगे....
सुधाकरराव ः (एकदम खेकसत) कायऽऽऽहे, हजारवेळा सांगितलं असेल आम्हाला साबण, उदबत्ती, पापड- कुरड्या असलं काही नको म्हणून. (खाली वाकून गेटकडे पाहत) वॉचमन, फिरत्या विक्रेत्यांना सोसायटीत कशाला सोडता?
पाहुणे ः अहो सुधाकरराव, मी तुमचा दूरचा पाहुणा आहे. मी काय फिरता विक्रेता वाटलो का? उन्हात फिरल्यामुळे माझ्या कपड्यांची अवस्था अशी झाली आहे.
सुधाकरराव ः मग काय बदलण्यासाठी कपडे मागायचा विचार नाही ना? तसं असेल तर जमणार नाही. पाच वर्षापूर्वी हिच्या माहेरचा माणूस पावसात भिजून घरी आला होता. त्यावेळी त्याला पायजमा आणि शर्ट बदलायला दिला होता. अजून त्याने तो परत केला नाही. त्यामुळे त्या चुकीची पुनरावृत्ती मी करणार नाही.
पाहुणे ः तुमची जुनी पुराणी कपडे घेण्यासाठी मी आलोय, असं वाटलं का? आधी घरात तरी घ्या. दारावरूनच परत घालवता की काय?
सुधाकरराव ः अरे हो...विसरलोच. आत या...
पाहुणे ः (सहज बोलल्यागत) अहो, तुमचे जावईबापू काल शनिपाराजवळ भेटले होते.
सुधाकरराव ः अहो, आमचे जावईबापू दिवसांतून शंभर लोकांना रोज भेटतात. म्हणून प्रत्येकाने आमच्या घरी येऊन, काल तुमचे जावईबापू भेटले होते बरं का, असं सांगू लागले तर कसं चालेल? बरं तुम्हाला जावईबापू भेटले, तर मी करणे अपेक्षित आहे. डान्स करू की उड्या मारू?
पाहुणे ः (गांगरून) ः सुरवातीला बोलायला काहीतरी विषय असावा म्हणून म्हटलं.
सुधाकरराव ः म्हणजे? तुमच्याकडे बोलायला काहीही विषय नाही. वेळ जात नाही म्हणून समोर आमचं घर दिसलं म्हणून तुम्ही घरी आलात काय? आम्हाला रिकामटेकडे समजलात काय?
पाहुणे ः अहो, तसं काही नाही. एवढा वेळ तुमच्याकडे मी आलोय. तुम्ही साधं चहा- पाणीही विचारलं नाही.
सुधाकरराव ः अहो, दुपारी कोण चहा पितं का? म्हणून विचारलं नाही. तुम्ही घरून जेवण करूनच आला असाल ना? म्हणून जेवता का? असंही विचारलं नाही. आम्हाला तोंडदेखलेपणे बोलायला अजिबात आवडत नाही.
पाहुणे ः अहो, इतकावेळ मी बोलतोय...
सुधाकरराव ः इतका वेळ बोलतोय म्हणजे? मग काय आम्ही तुमच्या बोलण्याचं मोबाईलवर शूटिंग करून, यूट्यूबवर टाकावं, अशी तुमची अपेक्षा आहे का? खरं तर आम्ही दुपारच्यावेळी कोणाला दारातही उभे करत नाही. पण तुम्ही आमचे लांबचे का होईना पाहुणे आहात म्हणून
घरात तरी घेतलंय.
पाहुणे ः तुमच्याकडे पाहुण्यांना चहा- कॉफीचं काही विचारत नाहीत का?
सुधाकरराव ः आमच्याकडे वेळी- अवेळी चहा- कॉफीची नाटकं अजिबात चालत नाही. सकाळी आठ वाजता पहिला चहा आणि दुसरा चहा सायंकाळी सहा वाजता होतो. त्याच्या अध्येमध्ये आम्ही असली थेरं करत नाही. पण तुम्हाला हवंय का चहा- कॉफी? तुम्ही म्हणत असाल तर नाइलाजास्तव तेही करतो पण दुपारची वेळ आहे म्हणून विचारतो, तुम्हाला चहा हवाय की काही थंड वगैरे काही हवंय.
पाहुणे ः (खूष होत) दोन्हीही द्या. त्यानंतर थोड्याच वेळात सुधाकररावांनी चहात बर्फ घालून आणला. ते पाहून पाहुण्यांना चक्कर आली.