
सोसायटीच्या प्रसंगावधनाने टळली जीवित हानी कासारवाडीतील घटना; आग शमविण्यासाठी स्वतःची अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित
पिंपरी, ता. ३१ ः पहाटे दोनच्या सुमारास सर्व गाढ झोपेत असताना भंगार टायरच्या वखारीला आग लागली. लगतच्या मंत्री सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी पदाधिकाऱ्यांना कळविले. सोसायटीतील सर्व रहिवासी जागे झाले. अग्निशामक दलाशी संपर्क साधला. आग व सोसायटीतील वाहनांमध्ये केवळ आठ फूट उंचीची संरक्षक भिंती होती. दुसऱ्या बाजूला लाकडाची वखार, त्यापुढे पेट्रोल पंप, शेजारी रुग्णालय व त्यातील ऑक्सिजन सिलिंडरची खोली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून सोसायटी पदाधिकाऱ्यांनी स्वतःची अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करून पाण्याचा मारा सुरू केला. रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मदत केली. त्यामुळे जीवितहानी टळून मोठे आर्थिक नुकसानही टळले. अग्निशामक दलाच्या १४ बंबांनी सुमारे साडेतीन तासांनी आग आटोक्यात आणली.
पुणे -मुंबई महामार्गावरील कासारवाडी- कुंदननगर येथील भंगार टायरच्या दुकानाला पहाटे दोनच्या सुमारास आग लागली. त्याच्या एका बाजूला मंत्री ॲटर्निटी सहकारी गृहनिर्माण सोसायटी आहे. तिच्या संरक्षक भिंतीला लागूनच भंगार टायरची खुली वखार आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला लाकडाची वखार व मॅक्स न्युरो हॉस्पिटल आहे. मागील बाजूस काही वर्कशॉप व रासायनिक कंपनी आहे. लाकूड वखारीसमोर महामार्गालगत पेट्रोलपंप आहे. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर सोसायटीतील सुरक्षारक्षक तुळशीराम कांबळे, रवी कुमार यांनी पदाधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी अग्निशामक दलाला कळवले. तोपर्यंत बहुतांश रहिवासी मुलांसह पहिल्या मजल्यावरील वाहनतळावर आले. सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगत टायर होते. त्यांनीही पेट घेतला होता. पदाधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून, सोसायटीची अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करून आग शमविण्यास सुरवात केली.
सोसायटीचे सहा नोझल
मंत्री सोसायटीच्या तीन विंग आहेत. प्रत्येक विंगवर ३९ सदनिका आहेत. तळमजला व पहिल्या मजल्यावर पार्किंग आहे. घटना घडली तेव्हा तळ मजल्याच्या पार्किंगमध्ये संरक्षक भिंतीलगत सर्व वाहने उभी होती. ती बाजूला केली. पहिल्या मजल्यावरील वाहनतळावर सोसायटीच्या अग्निशामक यंत्रणेचे नोझल आहेत. ते कार्यान्वित करून पाण्याचा मारा सुरू केला.
तरुणाई आघाडीवर
मंत्री सोसायटीतील तरुण चेतन आग्रवाल, अमन कौशिक, कुणाल जवळकर, जय फुगे, आदी जवळकर, प्रणव लांडे यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य नितीन अग्रवाल, नितीन जवळकर, सुनील तिकोने, राजेंद्र वर्मा, संदेश धुमाळ, श्याम लांडे यांनी आग शमविण्यासह रुग्णांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न केले. अन्य रहिवाशांनी पाण्याचे पाइप धरून आग शमविण्याचा प्रयत्न केला.
प्रशिक्षण कामाला आले
सोसायटीचे प्रशासक सुनील तिकोने मर्सिडीज बेंच कंपनीत व्यवस्थापक होते. अग्निशामकबाबत त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. तसेच, सोसायटीतील रहिवासी व सुरक्षारक्षकांना अग्निशामक विषयक प्रशिक्षण प्रात्याक्षिकांसह दिले आहे. त्याचा उपयोग मंगळवारी पहाटे लागलेली आग शमविण्यासाठी झाला, असे तिकोने व सुरक्षारक्षक अशोक भालेराव व सर्वेश कुमार यांनी सांगितले.
‘‘आग लागल्याचे कळल्यानंतर आम्ही सोसायटीच्या अग्निशामक यंत्रणेच्या सहा लाइन सुरू केल्या. त्यातून पाणी मारायला सुरवात केली. अग्निशामक दलाच्या बंबांनाही पाणी दिले. सोसायटीकतील तरुणांची खूप मदत झाली.
- नितीन अग्रवाल, खजिनदार, मंत्री ॲटर्निटी सहकारी सोसायटी, कासारवाडी
‘‘कंपनीत घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा रात्री आग शमविण्यासाठी झाला. अग्निशामक दलाच्या बंबांसाठी सोसायटीचे पाणी दिले. आमच्या एक लाख लिटर क्षमतेच्या तीन टाक्या आहेत. स्वतःच्या कूपनलिका आहेत. त्यांचे पाणी वापरले.
- सुनील तिकोने, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, मंत्री ॲटर्निटी सहकारी सोसायटी, कासारवाडी
‘‘टायर व लाकडाच्या वखारीची आग आमच्या रुग्णालयाच्या कॅंटिनपर्यंत पोहोचली. बाजूलाच ४५ ऑक्सिजन सिलिंडर होते.
‘‘कॅंटिनचे छत जळाले. फ्रिज व जनरेटरला झळ बसली आहे. रुग्ण व नातेवाइकांना सुरक्षितपणे बाहेर काढून स्थलांतरित केले.
- डॉ. उमेश फाळके, न्युरो सर्जन, कासारवाडी
‘‘आगीबाबत कळताच आमचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. मंत्री सोसायटीतील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचा धोका ओळखून रुग्णालयाकडून आग शमविण्यास प्रारंभ केला.
- ऋषिकांत चिपाळे, उपअग्निशामक अधिकारी, महापालिका
----फोटोः 21730
---------------------------------------
लाकडाची वखार, रूग्णालयाला झळ
पिंपरी ः लाकडाची वखार, रुग्णालयाची कॅंटिन, ऑक्सिजन सिलिंडरच्या खोलीलाही आगीची झळ बसली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबई-पुणे महामार्गालगत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर कुंदननगर येथे जय गणेश टायर दुकान आहे. कल्पना जैन व महावीर जैन माता-पुत्र टायरच्या दुकानाचे मालक आहेत. या दुकानासह शेजारील कोटेश्वर टिंबर या लाकडाच्या वखारीलाही झळ बसली.
छप्पर व काही लाकडे जळाली. त्या शेजारीच मॅक्स न्युरो हॉस्पिटल आहे. त्याच्या कॅंटिनचे छतही जळाले. जनरेटर व फ्रिजला झळ बसली. याच ठिकाणी ऑक्सिजनची ४५ सिलिंडर होती. रुग्णालयात १९ रुग्ण होते. त्यातील १५ जणांना महापालिकेच्या वायसीएमसह खासगी रुग्णालयात स्थलांतरित केले. चार जणांना घरी सोडण्यात आले. महापालिका अग्निशामक दलाच्या दहा बंबांसह पीएमआरडीए, पुणे महापालिका, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व टाटा मोटर्स कंपनी यांचे प्रत्येकी एक अशा १४ बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.
एका जेसीबीच्या साहाय्याने अन्य टायर बाजूला करण्यात आले. शेजारील मंत्री गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांनीही आग आटोक्यात आणण्यास मदत केली. आगीत कोणतीही जखमी झालेले नाही. पण, भितीचे वातावरण आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत आगीची धग सुरूच होती. अग्निशामकचे दोन बंब घटनास्थळी थांबून होते.
रुग्णांना ‘ओटू’ लावून हलविले
घटना घडली तेव्हा शेजारील मॅक्स न्युरो हॉस्पिटलमधील रुग्ण झोपेत होते. हॉस्पिटलचे संचालक डॉ. उमेश फालके यांच्या निगराणीखाली रुग्णांना स्थलांतरित केले. १२ रुग्णांना वायसीएममध्ये, तीन रुग्णांना खासगी रुग्णालयात व चार रुग्णांना घरी पाठवण्यात आले. त्यात आयसीयूमध्ये ११ व व्हेंटिलेटरवर चार रुग्ण होते. ऑक्सिजन (ओटू) लावून त्यांना स्थलांतरित केले. रुग्णालयात सर्व कर्मचारी अवघ्या काही मिनिटांत दाखल झाले होते, असे डॉ. उमेश फाळके यांनी सांगितले.
फोटो ः 21734