तेरा जणांना अटक करून सात पिस्तूल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेरा जणांना अटक करून सात पिस्तूल जप्त
तेरा जणांना अटक करून सात पिस्तूल जप्त

तेरा जणांना अटक करून सात पिस्तूल जप्त

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत पिस्तूल बाळगणाऱ्या तेरा जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून सात पिस्तूल व काडतुसे जप्त केली. आळंदी जवळील केळगाव येथे गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ज्ञानेश्वर बाळासाहेब पारवे (वय २२, रा. केळगाव), सिद्धेश सीताराम गोवेकर (वय २२, रा. आळंदी देवाची), यश शिवाजी भोसले (वय २२, रा. आळंदी देवाची) यांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एक कोयता जप्त केला. तसेच निघोजे येथील डोगरवस्ती येथे म्हाळुंगे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अजिंक्य कैलास जाधव (वय २३, रा. निगडी) याला अटक केली.
आरोपीकडून एक पिस्तूल व एक काडतूस जप्त केले. तर रहाटणीतील कोकणे चौक येथे गुंडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत चौघांना अटक केली. दत्ता गुंड (वय २२, नखाते वस्ती, रहाटणी), सुमीत शैलेंद्र गाडे (वय २१, रा. शिवार चौक, दुर्गामाता कॉलनी, रहाटणी), गणेश सुनील गुटाळ (वय २४, रा. नखाते वस्ती, रहाटणी), अशोक आनंदराम पटेल (वय २२ , रा. कुरुळी फाटा, ता. खेड ) यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, एक तलवार, दोन कोयते जप्त केले.
गुन्हे शाखेच्या अमली विरोधी पथकाने काळेवाडीतील नढेनगर येथील पाचपीर चौक येथील कारवाईत नीलेश भगवान तारू (वय ३२, रा. नढेनगर, काळेवाडी), अक्षय प्रकाश मानकर (वय २२, रा. उत्तमनगर, पुणे), वैभव सुरेश मानकर (वय ३०, रा. दांगटनगर, शिवणे) यांना अटक केली. तर हितेश सुरेश मानकर (रा. दांगटनगर, शिवणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपींकडून एक पिस्तूल, एक काडतूस, एक कोयता जप्त केला.
हिंजवडी पोलिसांनी मारुंजी येथील नेरे-कासारसाई रोडवरून साईकिरण मोहन गोरे (वय १९, रा. मारुंजी रोड, लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळ- नांदेड) याला अटक केली. त्याच्याकडून वीस हजारांचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पिंपळे गुरव येथील कृष्णा चौक येथून अनिकेत अशोक कदम (वय २२, रा. सृष्टी चौक, कदम चाळ, पिंपळे गुरव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले.