
‘माता रमाई जयंती सरकारने जाहीर करावी’
पिंपरी, ता. ६ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची १२५ वी जयंती सात फेब्रुवारी रोजी आहे. बाबासाहेब यांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रूत आहे. माता रमाई यांनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा आहे, तो सर्व घटकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात माता रमाई जयंती उत्सव साजरा होण्यासाठी आदेश द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. या बाबत खैरनार यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रतिवर्षी महाराष्ट्र सरकारच्या वतीने महान व्यक्तिमत्त्वांची जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम होत असतो. जयंती साजरी करताना ते महान व्यक्तिमत्त्व कोणते आहेत, याची यादी सरकारच्या वतीने वेळोवेळी प्रमाणित करण्यात येते. त्या अनुषंगाने प्रकाशित केल्या जाणाऱ्या यादीमध्ये कायमस्वरूपी माता रमाई जयंती उत्सवाचा समावेश करावा.’