
गुन्हे वृत्त
पार्सलच्या बहाण्याने
साडेअकरा लाखांची फसवणूक
पिंपरी : तरुणीला मेसेज करून पोलंडवरून सोने, हिऱ्याचे दागिने व रोख रक्कम पाठवली असून ते कस्टममधून सोडवून घेण्यास सांगितले. त्यासाठी तरुणीला वेगवेगळ्या बँक खात्यात वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली साडे अकरा लाख रुपये भरण्यास भाग पडले. मात्र, नंतर पार्सल न पाठवता तरुणीची फसवणूक केली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश सिंग, प्रकाश व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीशी इंस्टाग्रामद्वारे मैत्री करून विश्वास संपादन केला. व्हॉट्सॲपवर मेसेज करून तुझ्यासाठी पोलंडवरून सोने व हिऱ्याचे दागिने तसेच रोख रकमेचे पार्सल पाठवल्याचे सांगितले. ते कस्टममधून सोडवून घे असे सांगून महिला आरोपी व प्रकाश यांनी वेगवेगळ्या बँक खात्यात या पार्सलची कस्टम ड्यूटी, हायकोर्ट, मनी लॉन्डरिंग, पोलिस व्हेरिफिकेशन, ट्रान्स्फर चार्जेस, इन्शुरन्स, स्टॅम्प चार्जेसच्या नावाखाली एकूण ११ लाख ४९ हजार रुपये ऑनलाइन भरण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे पार्सल न देता फसवणूक केली.
------------------
महिलेसह पतीला मारहाण प्रकरणी दोघांना अटक
महिलेशी अश्लील वर्तन केले. महिलेचा पती तेथे आला असता त्यांना मारहाण केली. मी इथला गाववाला असल्याचे म्हणत, महिलेलाही मारहाण केली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली. हा प्रकार किवळेतील आदर्शनगर येथे घडला. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित गजानन वानरे (वय ३२, रा. शिवशंभो कॉलनी, आदर्शनगर, देहूरोड), सुलतान युसूफ खान (वय २७, रा. पंडित चाळ, गांधीनगर, देहूरोड) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी हे त्यांच्या पतीला शोधण्यासाठी मुकाई चौक येथे जात होते. किवळेतील आदर्शनगर येथील ईडन गार्डन सोसायटीकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर आले असता तेथे आलेल्या आरोपी अमित याने फिर्यादीला अश्लील भाषेत बोलत त्यांची छेड काढली. त्यावेळी फिर्यादीचे पती तेथे आले असता आरोपीने त्यांना मारहाण केली. फिर्यादीने पोलिसांना फोन करण्यासाठी मोबाईल बाहेर काढला असता त्यांच्या हातातील फोन हिसकावून रस्त्यावर आपटला. आरोपी अमित याने फोन करून सुलतान याला बोलावून घेतले. सुलतानने फिर्यादीला
शिवीगाळ करून पोटावर लाथ मारली.
---------------
अडीच लाख परस्पर दुसऱ्या खात्यात ट्रान्स्फर
दोन लाख साठ हजारांची रक्कम परस्पर दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्स्फर करून घेत एकाची फसवणूक केली. शरद भीमराव पवार (रा. गजानन महाराज नगर, लेन क्रमांक एक, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एचडीएफसी बँकेचे खातेधारक, इतर खातेधारक व अज्ञात व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यातून दोन लाख ५९ हजार ८५० रुपये ऑनलाइन पद्धतीने परस्पर एचडीएफसी बँकेच्या खात्यात तसेच इतर बँक खात्यात ट्रान्स्फर करून घेतले.
------------------
सभागृहातून साठ हजारांचा ऐवज चोरीला
पिंपरीतील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृहातून साठ हजारांचा ऐवज चोरीला गेला. महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या सभागृहात असताना त्यांनी त्यांचा दहा हजारांचा मोबाईल, पन्नास हजार रुपये किमतीची सोनसाखळी व दोन हजारांची रोकड पर्समध्ये ठेवली होती. दरम्यान,
ही पर्स चोरीला गेली.
-------------------
बदनामीची धमकी देत खंडणीची मागणी
आपल्याकडे असलेली महिलेबाबतची माहिती लग्नातील स्क्रीनवर दाखवून बदनामी करण्याची धमकी देत महिलेकडे दीड लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित ३२ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीला फोन केला. त्याच्याकडे फिर्यादी यांचा डाटा व सीडीआर डाटा असल्याचे सांगत हा डाटा त्यांच्या पतीकडे व त्यांच्या नातलगांमधील १० फेब्रुवारीला होणाऱ्या लग्नात
स्क्रीनवर दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यासाठी दीड लाख रुपयांची खंडणी मागितली.
------------------------
विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
तरुणीशी विनयभंग करून तिच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी रखवालदारासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार मोरवाडी येथे घडला.
पीडित सतरा वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश व सोसायटीतील तीस ते चाळीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी ही त्यांच्या राहत्या घरी भावासोबत असताना सोसायटीत रखवालदार म्हणून काम करणाऱ्या आरोपीने फिर्यादीचा हात पकडला. अश्लील भाषेत बोलत विनयभंग केला. त्यानंतर आरोपीने आरडाओरडा करून सोसायटीतील तीस ते चाळीस लोकांना जमा केले. ते सर्व लोक फिर्यादीशी हुज्जत घालून भांडू लागले. हा प्रकार मोरवाडीतील अजमेरा रोड वरील निमेष हौसिंग सोसायटीत घडला.
--------------------
डोळ्यात मिरची पूड टाकून रोकड लुटली
रूग्णालयातील वर्किंग रूममध्ये शिरून दोन चोरट्यांनी महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकत गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. हा प्रकार कासारसाई येथे घडला. महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या राक्षे डेंटल रुग्णालय येथील वर्किंग रुममध्ये असताना दोन जण तेथे आले. त्यांनी महिलेचे तोंड जोरात दाबून डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व पर्समधील रोकड असा एकूण २५ हजार ३०० रुपयांचा ऐवज लुटला. रूग्णालयात घुसून चोरट्यांनी लूटमार केल्याने खळबळ उडाली आहे.
--------------------------