
चिंचवडमध्ये ३३ उमेदवारांचे अर्ज वैध अवैध
चिंचवडमध्ये ३३ उमेदवारांचे अर्ज वैध
पिंपरी, ता. ८ : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले होते. यापैकी ३३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, ७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अर्ज अवैध ठरलेल्या ७ उमेदवारांमध्ये ‘आप’चे मनोहर पाटील यांचाही समावेश आहे. तर; भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा अर्ज वैध असल्याने बदली (डमी) उमेदवार शंकर जगताप यांचेही चार अर्ज अवैध ठरले आहेत.
उमेदवारांच्या अर्जांची आज (बुधवारी) छाननी प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी वैध आणि अवैध ठरलेल्या उमेदवारांची घोषणा केली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि पोलिस निरीक्षक अनिल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये अपक्ष चेतन ढोरे, गणेश जोशी, उमेश म्हेत्रे, प्रकाश बालवडकर, संजय मागाडे, भाजपचे बदली उमेदवार शंकर जगताप, ‘आप’चे उमेदवार मनोहर पाटील यांचा समावेश आहे. तर; अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल ऊर्फ नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम, बहुजन मुक्ती पार्टीचे सतीश कांबिये, बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टीचे प्रफुल्ल मोतिलिंग, आजाद समाज पार्टीचे (कांशीराम) मनोज खंडागळे आदी ३३ जणांचा समावेश आहे.
चौकट
‘आप’चा अर्ज अवैध
अर्ज छाननीत ‘आप’ला मोठा धक्का बसला. उमेदवार मनोहर पाटील यांच्या उमेदवारी अर्जात सूचक, अनुमोदक न दिल्याने अर्ज अवैध ठरला. अर्ज बाद झाल्यानंतर पक्षातील दोन गटात वाद होऊन, बाचाबाची झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, वेळ कमी असल्याने घाईगडबडीत उमेदवारी अर्ज भरल्याने त्यात चुका झाल्या. पक्षांतर्गत कसलेही वाद अथवा बाचाबाची झाली नाही, अशी माहिती ‘आप’चे शहर उपाध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले.