
गाडा येथे का लावला म्हणत हातगाडीचालकाला बेदम मारहाण
पिंपरी : गाडा येथे का लावला असे म्हणत तिघांनी मिळून हातगाडी चालकाला बेदम मारहाण केली. हा प्रकार भोसरी येथे घडला. नितीन मोहन वाघमारे (रा. सेक्टर क्रमांक १०, खंडेवस्ती, एमआयडीसी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता भास्कर सोनवणे (वय २०), भास्कर मसाजी सोनवणे (वय ४८), शरद कांबळे (वय ३२, सर्व रा. सेक्टर क्रमांक १०, खंडेवस्ती, एमआयडीसी, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे खंडेवस्ती येथील त्यांच्या स्नॅक सेंटरच्या हातगाडीवर थांबलेले असताना आरोपी तेथे आले. फिर्यादीला शिवीगाळ करून तू येथे गाडा का लावला? असे म्हणत हाताने मारहाण केली. आरोपी दत्ता याने चहाचा थर्मास फिर्यादीच्या डोळ्यावर मारून जखमी केले.
ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल चोरला
बसमधून उतरत असताना ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील मोबाईल चोरल्याची घटना हिंजवडी येथे घडली. शिवप्रसाद रंगनाथ तावरे (वय ६५, रा. बाप्पा रेसिडेन्सी, साखरेवस्ती, हिंजवडी, मूळ-सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कात्रज ते इन्फोसिस फेज एक या बसने प्रवास करीत असताना ते हिंजवडीतील शिवाजी चौक येथील थांब्यावर बसमधून उतरत होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरला.
दुकानाचे शटर उचकटून एक लाखांची रोकड लंपास
चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. हा प्रकार रहाटणी येथे घडला. अविनाश गोविंद कांबळे (रा. श्रीनंदा क्लासिक हौसिंग सोसायटी, श्रीनगर, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे ताथवडेतील औंध-रावेत बीआरटी रोडवर दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून एक लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली.
रागातून एकाला बेदम मारहाण
कामाचा राग मनात धरून दोघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. हा प्रकार काळेवाडी फाटा येथे घडला. बसंतलाल राजपत विश्वकर्मा (रा. शिवतीर्थ कॉलनी, थेरगाव, मूळ- उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिकास सरोज (वय २२), दीपक सरोज (वय २०) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी पूर्वीच्या कामाचा राग मनात धरून फिर्यादीला मारहाण केली. बिकास याने शिवीगाळ करून डोळ्यावर बुक्की मारली. तर दीपक याने पाठीमागून कशाच्या तरी साहाय्याने डोक्यात मारून जखमी केले.
तरुणीशी गैरवर्तन करून मारहाण
घरात शिरून तरुणीशी गैरवर्तन करीत मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवड स्टेशन येथे घडला. पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर चंद्रकांत कदम (रा. आनंदनगर, चिंचवड स्टेशन) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी घरात एकटी असताना आरोपी घरात शिरला. फिर्यादीशी अश्लील वर्तन करू लागला असता त्यांनी विरोध करीत आरोपीला ढकलून दिले. आरडाओरडा केल्याने आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून धमकी दिली.