
‘राज्य उत्पादन शुल्क परवाना नूतनीकरण दरवाढ कमी करा’
पिंपरी, ता. १२ : हॉटेल व्यावसायिक परमिटरूम धारकांच्या २०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ टक्के वाढ केली आहे. हॉटेल व्यावसायिकांची दिवसेंदिवस आर्थिक स्थिती बिकट होत आहे. त्यामध्ये कोरोना काळात झालेल्या आर्थिक नुकसानीमधून व्यावसायिक सावरलेले नाहीत. अशा अवस्थेत शुल्क वाढ करून हॉटेल व्यावसायिकांवर एक प्रकारे आघात केला आहे. याविषयी फेडरेशन हॉटेल ऑफ महाराष्ट्र संघटनेने ३१ जानेवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
त्याचबरोबर, पिंपरी-चिंचवड हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, उपाध्यक्ष हरीश शेट्टी, सत्यविजय तेलंग, महेश हेगडे, शंकर चक्रवर्ती, गणेश शेट्टी, उल्हास शेट्टी आदींनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन हॉटेल व्यावसायिकांच्या समस्येबाबत निवेदन दिले.
पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळानी खासदार श्रीरंग बारणे यांच्याद्वारे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडून शुल्काबाबत विचारविनिमय करून पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय घेवू, असे आश्वासन हॉटेल संघटनेला दिले.