क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात टोळक्याची तरुणाला कोयत्याने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात 
टोळक्याची तरुणाला कोयत्याने मारहाण
क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात टोळक्याची तरुणाला कोयत्याने मारहाण

क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात टोळक्याची तरुणाला कोयत्याने मारहाण

sakal_logo
By

पिंपरी : क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात चार जणांच्या टोळक्याने तरुणाला दगडाने व कोयत्याने मारहाण केली. हा प्रकार पिंपरीतील मिलिंदनगर येथे घडला. निखिल कसबे (वय १८, रा. मिलिंदनगर, पिंपरी), सनी धावरे (वय १९) व त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सलमान दिलावर शेख (रा. मिलिंदनगर, पिंपरी) याने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कसबे व निखिल ऊर्फ कवट्या हे क्रिकेट खेळत होते. या वेळी फिर्यादी सलमान तेथे आला. तो कवट्याला मला एक बॉल खेळू दे, असे म्हणाला. त्यावर कसबे याने आम्ही तुला खेळू देणार नाही. आम्ही पैशावर मॅच लावली आहे, असे सांगितले. यावरून झालेल्या वादात कसबे याने फोन करून त्याच्या दोन साथीदारांना बोलविले. सलमानला लाथाबुक्क्यांसह दगड व कोयत्याने मारहाण करीत जखमी केले. शिवीगाळ करून दमदाटी केली.

कोयत्याच्या धाकाने कामगाराला लुटले
पादचारी कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ऐवज लुटला. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे घडली. हेम नारायण मनंधर (रा. गुळवेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे एमआयडीसीतील एस ब्लॉक येथील रस्त्याने पायी जात असताना चोरटे दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून कोयत्याच्या उलट्या बाजूने मनंधर यांना मारहाण करून जखमी केले. त्यांच्याजवळील मोबाईल व रोकड असा वीस हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावून घेत तेथून पसार झाले.

महिलेला धक्काबुक्की करीत विनयभंग
महिलेला धक्काबुक्की व शिवीगाळ करीत विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार डांगे चौक येथे घडला. रोहन संजय धुमाळ (वय २२, रा. घोटावडे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा डांगे चौकात डान्स स्टुडीओ असून या स्टुडिओत महिला व आरोपी यांच्यात वाद झाला. आरोपीने महिलेच्या स्टुडीओची तोडफोड करीत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. गैरवर्तन करीत विनयभंग केला. दरम्यान, महिलेचे पती व पार्टनर मध्ये आले असता त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली.

खंडणी उकळणाऱ्या दोघांवर गुन्हा
वाकड परिसरात माथाडीचे काम करता यावे म्हणून हप्ता उकळणाऱ्या दोघांवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार वाकड येथे घडला. संतोष रंगराव चव्हाण (रा. दक्षतानगर, कस्पटेवस्ती, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय काशीद, प्रवीण यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना आरोपींनी जिवे मारण्याची धमकी देत वाकड परिसरात माथाडी काम करता यावे यासाठी दहा हजार रुपयांचा हप्ता मागितला. आरोपींच्या धमकीला घाबरून गुगल पेवर पैसे पाठवले. त्यानंतर पुन्हा १६ जानेवारीला आणखी पाच हजार रुपये पाठवले. मात्र, तरीही आरोपी हप्ता वाढवून मागत असल्याने चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली.

वाकडमध्ये माथाडी कामगाराला मारहाण
माथाडी कामगाराला काम करण्यास प्रतिबंध करून मारहाण करीत धमकी दिली. हा प्रकार वाकड येथे घडला. भारत सुनील काशीद (रा. गणेश पेठ, चिंचवडगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज पवार व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा माथाडी कामगार सुरेश कुसाळकर हे काम करीत असताना आरोपींनी तेथे जाऊन गाडी खाली करायला किती पैसे घेतले, अशी विचारणा केली. तेव्हा कुसाळकर यांनी आम्हाला पैसे माथाडी कामगार बोर्डातून मिळतात, असे सांगितले. या वेळी आरोपी पवार याने माल उतरण्यास प्रतिबंध करीत कुसाळकर यांना मारहाण केली. जबरदस्तीने त्यांच्या खिशातून दोन हजार रुपये काढून घेत धमकी दिली.

भोसरीत दत्त मंदिरातील दानपेटी फोडली
दरवाजाचे कुलूप तोडून दत्त मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी उचकटली. दानपेटीत जमा झालेली ३० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना भोसरीतील लांडेवाडी येथे घडली. प्रल्हाद
तुकाराम पासलकर (रा. आदिनाथनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लांडेवाडी येथे दत्त मंदिर रात्री कुलूप लावून बंद केले होते. पहाटे पाचच्या सुमारास मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. मंदिरात पाहणी केली असता आतील दानपेटी उचकटून त्यातील दत्तजयंतीनिमित्त जमा झालेली तीस हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे समोर आले.