कचरा सेवाशुल्कातून मिळणार ७४ कोटी

कचरा सेवाशुल्कातून मिळणार ७४ कोटी

पिंपरी, ता. १३ ः महापालिकेकडून ओला, सुका आणि घरगुती घातक कचऱ्याच्या विलगीकरणापोटी दरमहा ६० व वार्षिक ७२० रुपये शुल्क एक एप्रिलपासून आकारणी केले जाणार आहे. अन्य आस्थापनांकडून ९० पासून २०० रुपयांपर्यंत मासिक शुल्क आकारले जाईल. ही रक्कम मिळकतकराच्या देयकात (बिल) दर्शवली जाणार असून, यामाध्यमातून महापालिकेला वार्षिक सुमारे ७४ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार आहे.
सरकारच्या निर्णयानुसार, प्रतिदिन शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प स्वतः उभारावा, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला बहुतांश सोसायट्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, सुका कचरा महापालिकेमार्फतच संकलित करावा लागत असल्याने त्यासाठीचे सेवाशुल्क एक एप्रिलपासून मोजावे लागणार आहे. त्याची आकारणी २०२३-२४ च्या वार्षिक मिळकतकर बिलातून केली जाणार आहे. यात निवासी सदनिकांसह व्यावसायिक, मिश्र, औद्योगिक आस्थापनांचाही समावेश आहे.

मिळकती पाच लाख ९३ हजार
महापालिकेकडे पाच लाख ९३ हजार ८०५ मिळकतींची नोंद आहे. त्यात निवासी मिळकती पाच लाख सात हजार २५४ आहेत. बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र व इतर मिळून ७४ हजार ४८२ मालमत्तांची नोंद आहे. त्यातील निवासी सदनिकांना ६० रुपये; दुकाने, दवाखान्यांना ९० रुपये; शो-रूम, गोदामे, उपहारगृहांना १६० रुपये; लॉज व हॉटेलला २०० रुपये; दवाखाने, रुग्णालयांसाठी १६० ते २४० रुपये; शैक्षणिक, धार्मिक संस्था, सरकारी-निमसरकारी कार्यालयांसाठी १२० रुपये; मंगल कार्यालये, मॉल्स, चित्रपटगृहांसाठी दोन हजार रुपये आणि फेरीवाल्यांकडून १८० रुपये दरमहा कचरा वर्गिकरण शुल्क आकारले जाणार आहे. या सर्वांचा विचार केल्यास सरासरी ४२१ रुपये दरमहा व वार्षिक पाच हजार ५२ रुपये शुल्क भरावे लागेल.

असे असेल संभाव्य उत्पन्न
निवासी ः ३६,५२,२२,८८०
व्यापारी व इतर ः ३७,६२,८३,०६४
एकूण ः ७४,१५,०५,९४४

दृष्टिक्षेपात निवासी मालमत्ता शुल्क
निवासी मालमत्ता ः ५,०७,२५४
दरमहा कचरा शुल्क ः ६० रुपये
वार्षिक शुल्क ः ७२० रुपये
मिळू शकणारे एकूण वार्षिक शुल्क ः ३६,५२,२२,८८० रुपये

अंदाजे कचरा संकलन खर्च
कचरा संकलन वाहने ः ४२१ (घंटागाडी व इतर)
प्रतिदिन कचरा निर्मिती ः ११०० टन (सरासरी)
शहराची लोकसंख्या ः २७ लाख रुपये (अंदाजे)
कचरा वाहतूक वार्षिक खर्च ः ११० कोटी रुपये (सुमारे)

सध्याची मिळकतकर आकारणी (उदाहरणार्थ)
प्रशासकीय सेवा शुल्क ः ९
सामान्य कर ः ५३०४
वृक्ष उपकर ः २३१
मलप्रवाह सुविधा लाभकर ः ११५५
पाणीपुरवठा लाभकर ः ९२४
रस्ता कर ः ४६२
शिक्षण कर ः १३८६
एकूण मिळकतकर ः ९४७१
(टीप ः पाणी बिल वापरानुसार अर्थात मीटर रिडिंगनुसार आकारले जाते)

महाराष्ट्रासह, देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार वर्ग औद्योगिकनगरीत स्थायिक झाला आहे. शहरात बऱ्याच आस्थापनेत मंदीचे सावट कामगारावर आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झालेले आहे. अशा काळात कचरा वर्गीकरणापोटी सेवाशुल्क आकारण्याचा निर्णय योग्य नाही. निवासी घरासाठी सेवा शुल्क आकारू नये.
- मीना करंजावणे, पिंपळे गुरव

सरकारच्या २०१६ च्या निर्णयानुसार कचरा विलगीकरण शुल्क आकारले जाणार आहे. काही सोसायट्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करत आहेत. त्यांना मिळकतकरात सवलत दिली जाते. मात्र, शंभर टक्के कचऱ्यावर निर्माण करणाऱ्यांकडून प्रक्रिया केली जात नाही. सुका कचरा महापालिकेलाच संकलित करावा लागत आहे.
- रवीकिरण घोडके, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com