
अराईज इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवरायांचा जयघोष
पिंपरी, ता. १३ ः भोसरी येथील अराईज इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन घेण्यात आले. ‘वीरगाथा ऑफ छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर आधारित विषयांवर नाट्य, नृत्य व संगीताद्वारे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा जीवनपट यावेळी सादर केला.
भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात हा कार्यक्रम थाटामाटात झाला. स्नेहसंमेलनाचे अध्यक्षपद माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. जे. एस. पी. एम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, रणजितसिंह पाटील कव्हेकर (मॅनेजिंग डायरेक्टर, जे. एस. पी. एम), माजी नगरसेवक विक्रांत लांडे, नम्रता लोंढे, योगेश लोंढे, विलास मडिगेरी, अरुण पवार उपस्थित होते.
अजितसिंह पाटील कव्हेकर म्हणाले, ‘‘जेएसपीएम संस्थेचे ध्येय विद्यार्थांना एक चांगला माणूस बनवणे आहे. त्यासाठी अध्यात्म, विज्ञान व व्यावसायकिता या त्रिसूत्रीवर आधारित शिक्षण देत आहे.’’
नर्सरीपासून ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थांनी यात सहभाग नोंदवला. पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्राचार्य जितेंद्र खैरनार, सांस्कृतिक प्रमुख कृष्णा यादव व समीक्षा सैनी यांनी शाळेचा अहवाल सादर केला.
मीनाक्षी सबलका, नीलेश कुलकर्णी, प्रज्ञेय गुरुचल व सई गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य खैरनार, उपप्राचार्या सलोमी अग्रवाल, प्रतीक्षा चव्हाण, मकरंद जोशी, नृत्य शिक्षक राहुल राजपूत, संगीत शिक्षक नीलेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
फोटो ः 24545, 24546