‘गण गण गणांत बोते’चा घोष

‘गण गण गणांत बोते’चा घोष

पिंपरी, ता. १३ : श्री गजानन महाराज शेगांव यांचा १४५ वा प्रगट दिन ‘गण गण गणांत बोते’चा जयघोष करीत शहरात उत्साहात साजरा झाला. महापूजा, भजन, कीर्तन, भक्तीगीत, महाप्रसाद, आरोग्य शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
निगडी प्राधिकरणमधील सेक्टर क्रमांक २७ येथील समर्थ सद्‍गुरू श्री गजानन महाराज मंदिर येथे श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, शैलेजा मोरे, शर्मिला बाबर, धनंजय काळभोर, संगीता भोंडवे आदी उपस्थित होते. पहाटे काकड आरती, त्यानंतर सीमा दिघे, प्रेमा हेगडे, कल्याणी पिसे यांच्या हस्ते महापुजा, महाभिषेक व आरती झाली. सकाळी नऊ ते अकरा यावेळेत गोपाळ कोकाटे व सहकारी यांचा भावसुमने हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता यशवंत पाटील व पुरुषोत्तम गोळे यांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप सुरू झाले. दरम्यान, डॉ. अनघा राजवाडे व सहकारी यांचा शेगांवच्या महंता हा भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम तर, अविनाश लेले, शुभांगी मुळे, मोहन पारसनीस, रवी शिधये, नरेंद्र काळे यांनी भक्तीरंग हा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. सायंकाळी ६ ते ८ यावेळेत चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन झाले. रमेश ढमढेरे व अतुल इनामदार यांच्या हस्ते महाआरती झाली.
तसेच गजानन महाराज ट्रस्ट, सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट, प्रांत पोलिसिंग मित्र संघ व निसर्गराजा मित्र जिवांचे यांच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. प्रगटदिनाच्या पूर्व संध्येला प्राधिकरणातून पालखी मिरवणूक काढली. यावेळी भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या टाकत, महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. हजारो भाविकांनी औक्षण करून दर्शन घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ पिसे, एम. एस. तारक, एम. इ. जाधव, उपाध्यक्ष भाऊराव खडसे, सचिव देविदास हरमकर, खजिनदार महादेव कथले, अभय तारक रसिक पिसे, विकास ठाकरे, रवी मिरजी, सचिन राडे आदींनी परिश्रम घेतले.
चिंचवड तानाजीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहाटे श्रींना केशर दुधाचा अभिषेक, श्री गजानन विजय ग्रंथातील प्रथम अध्यायाचे पठण, महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी बारा वाजता श्रींची प्रगटवेळ, गजर व महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. दुपारी श्री गजानन हरिपाठ मंडळाचे भजन झाले. त्यानंतर मंत्र जागर व सायंकाळी साडे पाचला नित्याची आरती झाली. रात्री गीतसंध्या हा कार्यक्रम झाला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
दिघी येथील मंदिरात श्री संत गजानन महाराज (शेगाव) सेवाभावी सार्वजनिक ट्रस्टच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सकाळी अभिषेक, महापूजा यासह सकाळी दहा ते बारा यावेळेत यशवंत महाराज चौखंडे यांचे प्रगट दिनानिमित्त कीर्तन झाले. दुपारी इंद्रायणी भजनी मंडळ व मुक्ताई महिला भजनी मंडळाची भजनसेवा झाली. सायंकाळी सुरेश महाराज वारके यांचे कीर्तन झाले. श्री गजानन विजय ग्रंथ परायणाचेही आयोजन केले होते. रविवारी व सोमवारी नवचंडी यज्ञ झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com