
हप्ता मागत धमकी देणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा
केसमध्ये अडकविण्याची धमकी;
बाणेरमध्ये महिलेसह एकावर गुन्हा
पिंपरी, ता. १३ : ‘हा माझा चौक आहे, येथे गाड्या लावून व्यवसाय करायचा असेल तर दररोज हप्ता द्यायचा, नाहीतर माझी मुलगी वकील आहे, खोट्या केसमध्ये अडकवेन,’ अशी धमकी देणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बाणेर येथे घडला.
तुषार मल्हारी कोकरे (रा. राजमाता जिजाऊनगर, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विठ्ठल वाडकर (वय ५८), व एक महिला (वय ५२, दोघेही रा. बाणेर रोड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा बाणेरमधील बिट वाईस कंपनीसमोर भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्यासह नारळविक्रेता विशाल व भाजीविक्रेता प्रमोद धनावडे हे देखील येथे व्यवसाय करीत असताना महिला आरोपी तेथे आली. ही जागा आमच्या मालकीची असून तुम्हाला येथे गाड्या लावायच्या असतील तर दरदिवशी तीनशे रुपये तसेच पाचशे रुपये हप्ते द्यावे लागतील. असे म्हणत फिर्यादीकडून रोख व ऑनलाईनद्वारे पैसे मागून घेतले. पैसे दिले नाही तर फिर्यादी यांना ‘माझी मुलगी वकील आहे, तुझ्यावर तक्रार दाखल करीन’ अशी धमकी देत भाजीवर थुंकून भाज्या रस्त्यावर फेकल्या. तसेच आरोपी वाडकर याने महिला आरोपीचे नाव सांगून जबरदस्तीने दहा किलो कांदे व बटाटे पैसे न देताच घेऊन गेला. महिला आरोपीने पुन्हा फिर्यादीला शिवीगाळ करीत भाज्यांचे नुकसान केले. ‘हा चौक माझा आहे, तुम्ही भिकारी आहेत, तू जर मला पैसे वाढवून दिले नाही तर तुझ्यावर आजच हिंजवडी पोलिस स्टेशनला जाऊन, तुम्ही कोयता गॅंगचे, मारणे गॅंगचे पोरं आहेत, तू दारू पिऊन आला आहे, तुझ्यावर केस करून कशी अडकवते ते बघच,’ अशी धमकी दिली. जबरदस्तीने पैशांची मागणी केली. हप्ता म्हणून रोख व ऑनलाईन तिच्या पतीच्या फोन पेवर दररोज पैसे घेतले.