
निगडीत शनिवारी, रविवरा राष्ट्रीय क्रीडा आयुर्वेद परिषद
पिंपरी, ता. १४ ः क्रीडा आयुर्वेदातील अनुभव लोकांसमोर मांडण्यासाठी ‘क्रीडाकुल’च्या रौप्य महोत्सवानिमित्त १८ व १९ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा आयुर्वेद परिषद’ होत आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रातील मनोहर वाढोकर सभागृहात ती होणार आहे, अशी माहिती ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘आयुर्वेद वैद्यांची राष्ट्रीय संघटना-आयुर्वेद व्यासपीठ आणि महाराष्ट्रातील क्रीडा शास्त्रांच्या प्रशिक्षणातील अग्रगण्य संस्था महाराष्ट्रीय मंडळ, पुणे या संस्था परिषदेच्या सह आयोजक आहेत. परिषदेसाठी आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे. परिषदेत आयुर्वेदातील गाढे अभ्यासक विनय वेलणकर, त्रिलोक धोपेश्वरकर, ऊर्मिला पिटकर यांची व्याख्याने आहेत. केरळमधील प्रसिद्ध कर्मचिकित्सा मांडण्यासाठी डॉ. राजेश एस. व फ्रान्सच्या अॅथलिट मरिअम गुलियट आपले अनुभव सांगण्यासाठी येत आहेत. क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. उत्क्रांत कुर्लेकर, कौस्तुभ रेडकर, शर्वरी इनामदार, प्रकाश ठोंबरे उपस्थित राहणार आहेत. देशभरातून १०० हून अधिक आयुर्वेद वैद्य आणि क्रीडा प्रशिक्षकांची नोंदणी व ४० शोध निबंध दाखल झाले आहेत. वैद्य, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडूचे पालक यांच्यासाठी ती खुली आहे.’’
पत्रकार परिषदेस प्रा. डॉ. महेश देशपांडे, वैद्य उदय जोशी, वैद्य दीप्ती धर्माधिकारी, राष्ट्रीय प्रशिक्षक भगवान सोनवणे, व्यवस्थापक प्रमुख आदित्य शिंदे उपस्थित होते.