
लोकप्रतिनिधींचा पर्यावरण अभ्यास हवा
पिंपरी, ता. १५ : राज्यातील सर्वांत प्रदूषित नदीपैकी एक पवना नदी आहे. चिंचवड मतदारसंघातून ही नदी सुमारे १२ किमी वाहते. परंतु, सांडपाणी, रसायनयुक्त पाणी, मैलापाणी यामुळे प्रचंड प्रदूषित झाली आहे. दरवर्षी हजारो जलचरांचा जीव जातो. शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे...पर्यावरण विषय कधीच जाहीरनाम्यात नाही. पर्यावरण पूरक बाबींना महत्त्वपूर्ण स्थान देणारे आमदार हवेत अशा प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमी संस्था व संघटनांच्या आहेत.
नव्या आमदारांकडून काय अपेक्षा याविषयी सकाळने विविध स्तरातील पर्यावरण प्रेमींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
---
हवा, जमीन व पाणी प्रदूषणाचा अभ्यास करून योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. यासाठी पर्यावरण संघटनांसोबत एकत्रित काम करणे आवश्यक आहे. नदीकाठ सुधार योजना प्रणाली योजनेत केवळ काठाचे सुशोभीकरण न करता तिला पुनर्जिवीत करायला हवे. कृत्रिम दिखाव्याच्या गोष्टी नकोत. नदीकाठचे अतिक्रमण रोखावे. त्याभोवती देशी झाडांची लागवड अपेक्षित आहे. नदीचे क्षेत्र अबाधित राहणे गरजेचे आहे. पाण्यातून व हवेतून झालेले प्रदूषण घातक आहे. नदी जिवंत आहे तिकडे जनसंख्या स्थलांतरित होत आहेत. हे भविष्यासाठी धोकादायक आहे. याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
डॉ. विश्वास येवले, जलदिंडी प्रतिष्ठान, अध्यक्ष
--
सर्वच पक्षांच्या सदस्यांनी २२ वर्षात नदी प्रदूषणा विरोधात ठोस उपाययोजना किंवा नदी स्वच्छता प्रकल्प राबविलेला नाही. १९९७ पासून चिंचवड भागातील १२०० हेक्टर हरितपट्टा हा रहिवासी पट्ट्यात बदलण्यासाठी याच आमदारांचा हट्ट कारणीभूत ठरला. जमिनीच्या वाढत्या भावामुळे बांधकाम व्यावसायिक व राज्यकर्त्यांच्या भ्रष्ट युतीमुळे चिंचवडमधील मोठा हरितपट्टा नाहीसा झाला आहे. निळ्या पूररेषांमध्ये अनधिकृत बांधकाम उभे राहिल्यामुळे पात्र सुद्धा कमी झाले आहे.
- विजय पाटील, प्राधिकरण नागरी कृती समिती, अध्यक्ष
--
पर्यावरणाकडे कोणीही लक्ष देत नाहीत. निवडणूक अहवालामध्ये कुठल्याही प्रकारची पर्यावरणासाठी तरतूद नसून प्रयत्न होताना दिसत नाही. पोकळ आश्वासने असतात. खरं तर पर्यावरणासाठी एका विशिष्ट निधीची तरतूद करून आपल्या भागातील पवना नदीला जिवीत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पर्यावरणाबाबत हवी. प्रचंड उदासीनता आहे. पर्यावरण संतुलित करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत. कुठलाही निधी उपलब्ध केला जात नाही.
- थेरगाव सोशल फाउंडेशन
--
सध्या कचऱ्याचे डोंगर बऱ्याच ठिकाणी नजरेस पडत आहेत. सांडपाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई आवश्यक आहे. जलपर्णी हटविणे गरजेचे आहे. इ वेस्टवर जनजागृती हवी. भूजल पातळी खालावली आहे. सर्व सोसायट्यांना रेन वॉटर सक्तीचे करणे आवश्यक आहे.
- विनिता दाते, पर्यावरण संवर्धन समिती, अध्यक्ष
--
रावेत बंधारा ते दापोडी इथपर्यंत नदी मृत झाली आहे. रावेत बंधारा की, जेथे पिण्याच्या पाण्यासाठीचा शहरासाठी उपसा आहे. तेथेच, जलपर्णीची प्रचंड वाढ झाली. नदी प्रकल्प उगम ते संगम असा राबविला पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरात नदीवर जे एसटीपी बसवले आहे त्यावर पॉवर बॅकअप पाहिजेत. वीज जाते त्यावेळी नाल्यातील पाणी तसेच मिसळले जाते. नदीत भराव टाकण्याचे काम सुरू असते, त्यावर ठोस पावले उचलली पाहिजेत. घाट प्रेक्षणीय स्थळ बनले पाहिजेत. संस्था, व्यक्तींना पाठिंबा देणाऱ्या योजना आखल्या पाहिजेत.
- राजीव भावसार, जलदिंडी प्रतिष्ठान, सदस्य