रस्ता रुंदीकरणात गेलेल्या मिळकतीचे १३ वर्षांनी बिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता रुंदीकरणात गेलेल्या 
मिळकतीचे १३ वर्षांनी बिल
रस्ता रुंदीकरणात गेलेल्या मिळकतीचे १३ वर्षांनी बिल

रस्ता रुंदीकरणात गेलेल्या मिळकतीचे १३ वर्षांनी बिल

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः त्यांचे घर २००८ मध्ये रस्ता रुंदीकरणात गेले. महापालिकेला जागेचा ताबा दिला. त्या जागेवर रस्ता झाला. रहदारी सुरू झाली. मिळकतकर व पाणीपट्टी बंद करण्याबाबत त्यांनी करसंकलन व पाणीपुरवठा विभागाला लेखी कळविले. त्यानंतर नऊ वर्षांनी त्यांना जागेचा मोबदला मिळाला. आणि आता करआकारणी व करसंकलन विभागाने त्यांना २०२२-२३ या वर्षाचा तब्बल १२ हजार ९३७ रुपये मिळकतकर भरण्याबाबत बिल पाठवले. तो भरण्याबाबत त्यांच्यामागे तगादा लावला आहे. याबाबत त्यांनी प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे धाव घेतली असून मानसिक त्रास झाल्याने गाऱ्हाणे मांडले आहे. यातून करसंकलन विभागाचा आंधळा कारभार समोर आला आहे.

चिंचवड येथील शरद कुस्तुरे यांचे तानाजीनगर सर्वे क्रमांक २७८ मध्ये एक हजार चौरस फूट जागा (एक गुंठा) १९९० मध्ये विकत घेतली. त्यावर चार खोल्यांचे घर बांधले. स्वतःच्या घरात राहण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले. नियमानुसार, घराचा टॅक्स अर्थात मिळकत कर व व पाणी बिल नियमितपणे दरवर्षी भरत राहिले. पण, २००८ मध्ये महापालिका नगररचना विभाग व ‘ब’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची त्यांना नोटीस आली. त्यात म्हटले होते की, ‘तुम्ही केलेले बांधकाम विकास आराखड्यास बाधक ठरत असल्याने त्याचा वापर बंद करावा. ते बांधकाम काढून टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत बांधकाम काढून वापर तत्काळ थांबवावा अन्यथा फौजदारी कार्यवाही केली जाईल.’ त्यानुसार कस्तुरे यांनी घराचा ताबा महापालिकेला दिला. घरपट्टी व पाणीपट्टी बंद करण्याबाबत अर्ज दिला. तेव्हाचा मिळकतकर २५४ रुपये भरणा केला. त्यानंतर त्या जागेवर रस्ता झाला. रहदारी सुरू झाली. मोबदला मात्र नऊ वर्षांनी अर्थात जुलै २०१९ मध्ये मिळाला.

आता मिळकतकराचे बिल
कस्तुरे यांना २०२२-२३ या वर्षासाठीचे मिळकतकराचे १२ हजार ९३७ रुपयांचे बिल प्राप्त झाले आहे. त्यात मागील बाकी ११ हजार ७७ रुपये आणि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीचे एक हजार ६०३ आणि दुसऱ्या सहामाहीचे २५७ रुपये दर्शविले आहेत.

शास्ती अर्थात दंडाचा समावेश
मिळकतकराच्या बिलामध्ये अनधिकृत बांधकामाला लावल्या जाणाऱ्या शास्तीचाही (दंड) उल्लेख आहे. ती रक्कम पाच हजार ४६४ रुपये असून थकबाकी दाखवली आहे. त्यात मागील शास्ती थकबाकी चार हजार २५४ असून, चालू शास्ती एक हजार २१० रुपये आहे.

असे आहे मिळकतकर बिल (रुपयात)
करावे नाव / थकबाकी / चालू बिल / एकूण
प्रशासकीय सेवा शुल्क / १०५ / १० / ११५
सामान्य कर / ३,८५१ / ३०२ / ४,१५३
वृक्षकर / १६९ / १३ / १८२
मलप्रवाह सुविधा लाभकर / ७६७ / ६३ / ८३०
पाणीपुरवठा लाभकर /६५० / ५० / ७००
रस्ता कर / ३०० / २५ / ३२५
शिक्षण कर / ६५० / ५० / ७००
शास्ती / ४,२५४ / १२१० / ५,४६४
नोटीस शुल्क / ३३१ / १३७ / ४६८
एकूण / ११,०७७ / १,८६० / १२,९३७

महापालिकेकडून मिळकतकर थकबाकी वसुली सुरू आहे. त्यात दहा हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सर्वांना नोटीस पाठवल्या आहेत. शरद कस्तुरे यांच्या तक्रार अर्जानुसार तपासणी केली असता त्यांची जागा रस्ता रुंदीकरणात गेल्याची व मिळकतकर रद्दची नोंद तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मिळकतकर आकारणी विभागाकडे झालेली नसल्याचे आढळले आहे. ती नोंद करून त्यांचे मिळकतकराचे बिल रद्द केले जाईल. त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, करआकारणी व करसंकलन विभाग, महापालिका