सुरक्षितता आणि विविध सुविधा द्याव्यात
ज्येष्ठ नागरिकांच्या आमदाराकडून अपेक्षा, ग्रुप इन्शुरन्स चालू करण्याची मागणी

सुरक्षितता आणि विविध सुविधा द्याव्यात ज्येष्ठ नागरिकांच्या आमदाराकडून अपेक्षा, ग्रुप इन्शुरन्स चालू करण्याची मागणी

पिंपरी, ता. १७ ः चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळत आहे. आमदाराकडून ज्येष्ठ नागरिकांनी हिताच्या, त्यांच्या सुरक्षेच्या अन् सुविधेच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक संघासाठी बसण्याची व्यवस्था, करमणूक साहित्य, स्वच्छतागृह, वीज-पाणी अशा सुविधा द्याव्यात. महापालिकेने ज्येष्ठ नागरिक संघासाठी १० कोटीचा स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ग्रुप इन्शुरन्स’ चालू करावा. आमदार निधीतून ३० टक्के रक्कम ज्येष्ठ नागरिकांकरिता वापरण्यात यावा, अशा मागण्या ज्येष्ठांनी केल्या आहेत.

‘‘नवनिर्वाचित आमदारांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्‍न समजून घेऊन, सहकार्य करावे. आरोग्यविषयक सवलती, रेल्वे व विमान प्रवासात पूर्वीप्रमाणे ५० टक्के सवलतीची सोय उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. विरंगुळा केंद्रासाठी जागा, साहित्य उपलब्ध करून द्यावे. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना अर्थसाहाय्य, मदत करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.’’
-रमेश इनामदार, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड

‘‘ज्येष्ठ नागरिक संघाच्या अडचणी समजून घेणे. त्यासाठी महापालिकेच्यावतीने विभागीय अधिकारी नेमणे व संघाच्या अडचणीचा पाठपुरावा करून त्याची पूर्तता करणे. माहिती घेणारा आमदार असावा. सोसायटी सुरक्षा, कुत्री चावणे, कचराकुंडी, रस्ता, वीज यासाठी नगरसेवकांना जाब विचारला पाहिजे. सोसायटीमध्ये गुंडगिरी बंदोबस्त, पोलिस संरक्षण असावे. आमदाराने संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी.
ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा, तपासण्या महापालिका रूग्णालयात मोफत कराव्यात तर खासगीमध्ये ५० टक्के सूट देण्यात यावी.
-रामदास माळी, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, एम्पायर इस्टेट

‘‘चिंचवड मतदार संघाचा परिसर खूप मोठा असल्याने अशा परिसरात दोन/सहा महिन्यातून एकदा तरी आपल्या मतदाराच्या गाठीभेटी घ्याव्यात. कारण बरेच आमदार एकदा निवडून आले की मतदार संघाकडे पाठ फिरवतात. आमदारांनी संविधानातील तरतुदी नुसारच वागावे.
-प्रकाश निसळ, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, बिजलीनगर

‘‘विशालनगर येथून हिंजवडी कडे जाणारा मोठा रस्ता आहे. त्या ठिकाणी देखील कोठेच स्वच्छतागृह नाही. या रस्त्यावर २२ वर्षापूर्वी पुणे येथून मुंबई कडे जाणाऱ्या सर्व महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या सर्व बससाठी अधिकृत असा बस थांबा अन् तसा अधिकृत बोर्ड लावल्यास नागरिकांची सोय होईल. विशाल नगरचे पूर्वेस मिलिटरीचे भले मोठे कुंपण आहे. अन् बाजूला पदपथ आहे. बाकी सर्व ठिकाणी पदपथ चांगले केले आहे. परंतु हा पदपथ दुर्लक्षित राहिला आहे.’’
-गोविंद गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघ, पिंपळे निलख

‘‘नवनिर्वाचित आमदारांनी ज्येष्ठांचे प्रश्न समजून घ्यावेत. कमी पैशात आरोग्याच्या चांगल्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना सुरक्षा पुरवावी. आज शहरातील सुरक्षा धोक्यात आली असून, पोलिस यंत्रणेमार्फत ज्येष्ठ नागरिक मोकळ्या वातावरणात वावरू शकतील अशी परिस्थिती निर्माण करावी. रस्त्यावरील अफाट गर्दीमुळे ज्येष्ठांना एकटे फिरणे धोकादायक झाले आहे. तरी निरनिराळ्या भागांत सार्वजनिक बागांमध्ये ज्येष्ठांसाठी वॉकिंग ट्रॅक तयार करावेत.’’
-रमेश डोंगरे, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड

‘‘आमदार त्याच्या स्थानिक गावातून निवडून येतो. तो फक्त त्याच गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असतो.
वास्तविक चिंचवड प्रभाग मोठा आहे. मामुर्डी, किवळे अन् देहूरोड गावपर्यंतचा परिसर समाविष्ट आहे. समाविष्ट गावांचा विकास करणे,
अपेक्षित आहे.
-जयवंत भोसले, कार्याध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक बिजलीनगर

‘‘महापालिकेच्या रूग्णालयात ज्येष्ठांसाठी आरोग्य साधने स्वस्तात उपलब्ध व्हावीत. बेडपान, व्हीलचेअर, पलंग कमी दरात दवाखान्यात मिळण्याची अपेक्षा आहे. यासाठी आमदारांनी पाठपुरावा करावा. ज्येष्ठांच्या विरंगुळासाठी साहित्य उपलब्ध करावेत.’’
-अरविंद जोशी, ज्येष्ठ नागरिक चिंचवड


‘‘आमदाराकडून एकच अपेक्षा करतो की रस्ते, वीज, पाणी मुबलक असताना सर्व सामान्य नागरिकास त्याचे प्रशासकीय पातळीवर नीट नियोजन करण्यात यावे. भ्रष्टाचार न करता सर्वांचेच राहणीमान सुरक्षित व सुखकारक कसे राहील, याकडे लक्ष देणारा आमदार असावा, मग सरकार कुणाचीही असो.
-वसंतकुमार गुजर, ज्येष्ठ नागरिक


ईपीएफ ९५चा निकाल अजून लागत नाही. पण ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर मिळणाऱ्या तुटपुंज्या व्याजात वाढ मिळावी. ज्यायोगे त्यांच्या औषध पाण्याची सोय होईल.
- गोपाळ भसे, ज्येष्ठ नागरिक

‘‘ज्या ज्येष्ठांना कोणत्याही प्रकारची आर्थिक प्राप्ती नाही. तसेच ते एकटे अथवा पती- पत्नी असे दोघेच असतात. त्यांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत दरमहा देण्यात यावी. ज्येष्ठांसाठी शासनाने किंवा महापालिकातर्फे वृद्धाश्रम सुरू करावेत. एकटे राहणारे ज्येष्ठांना संरक्षण मिळावे. ज्या ज्येष्ठांचा मुले व मुली सांभाळ करीत नाहीत, अशा ज्येष्ठांची माहिती घेऊन मुलांच्यावर कारवाई करण्यात यावी. ’’
-चंद्रकांत कोष्टी, ज्येष्ठ नागरिक चिंचवड

‘‘चिंचवड मतदार संघात पोट निवडणूक होत आहे. मतदारसंघात बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांना पीएमपीच्या बस सेवा योग्य नाही. जनतेचे प्रश्न सोडविणारा आमदार हवाय. महिला असुरक्षित आहेत. सार्वजनिक वाहतूक सक्षम हवी.’’
-अनिता निकाळजे, वाल्हेकर वाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com