महाशिवरात्र ः विविध धर्मिक कार्यक्रमांसह शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा शहरात हर हर महादेवाचा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाशिवरात्र ः विविध धर्मिक कार्यक्रमांसह शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा
शहरात हर हर महादेवाचा नारा
महाशिवरात्र ः विविध धर्मिक कार्यक्रमांसह शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा शहरात हर हर महादेवाचा नारा

महाशिवरात्र ः विविध धर्मिक कार्यक्रमांसह शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा शहरात हर हर महादेवाचा नारा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ : महाशिवरात्रीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी (ता. १८) शनिवारी शिवभक्तांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच रुद्राभिषेक, पूजा-अर्चा, शिवलीलामृत पारायण, अखंड हरिनाम, महारुद्राभिषेकामुळे शहरातील वातावरण भक्तीमय झाले होते. ‘हर-हर महादेव’चा नारा करण्यात भाविक तल्लीन झालेले होते.
महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच मंदिरामध्ये महारुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून शिवलीलामृत पारायण देखील सुरु होते. सकाळी ९ वाजल्यापासून मंदिरामध्ये महाप्रसादासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती. काही मंदिरामध्ये दिवसभर भजन-कीर्तन तर, स्वरसंगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सामुदायिक महाआरती व हरिजागरसाठी सायंकाळी ६ ते ६.३० वाजता मोठ्या प्रमाणात भाविकांनी मंदिरामध्ये आवर्जून उपस्थित होते. दिवसभर विविध कीर्तनकाराच्या काल्याच्या कीर्तनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. सकाळी काकडा आरतीसाठी देखील स्थानिक भाविकांनी हजेरी लावली होती. दिवसभरांच्या भरगच्च धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
रहाटणी, काळेवाडी, चिंचवड, यमुनानगर, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपरीगाव, निगडी या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासून साबुदाणा खिचडी, केळी व राजगिरा लाडूचे वाटप सुरु होते. महाप्रसादासाठी मंदिरात जय्यत तयारी केली होती. भाविकांनीही आवर्जून महाप्रसादाचा लाभ घेतला. शनिवार व रविवार जोडून सुट्या आल्याने अनेकांनी मंदिरामध्ये देव दर्शनाचाही आनंद घेतला. मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. कोरोना काळात महाशिवरात्री साजरी न झाल्याने यावर्षी भाविक व मंदिर व्यवस्थानामध्येही मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण होते. सोशल मीडियावरह शिव भक्तांनी शिवशंभोच्या रिल्स बनविल्या होत्या. डीपी आणि स्टेटसही अपडेट केल्याचे पहावयास मिळाले. महाशिवरात्रीच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
--
बाजारपेठेलाही बहर
बहुतांशी भाविक उपवास करत असल्याने उपवासाची बाजारपेठ चांगलीच बहरली होती. बाजारात साबुदाणा, शेंगदाणा, राजगिरा, खजूर आणि फळांच्या मागणीला मागणी असल्याचे दिसून आले. तसेच, फळांमध्ये रताळे, केळी, पेरू, मोसंबी, पपई, द्राक्षे, कलिंगड आदी फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. शिवाय, खजूर, राजगिरा लाडू, चिक्की आदी पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. त्याचबरोबर मंदिराबाहेर बेल, फुलांना मागणी होती. त्याचबरोबर, दुधाच्या पिशवीची अभिषेकासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
--