
पवनमावळात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा
सोमाटणे, ता. १९ ः पवनमावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पवनमावळातील शिवप्रेमी व शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. राज्यातील दुर्मिळ छत्रपती शिवाजी महाराज मंदिर असलेल्या गहुंजे येथे शिवप्रेमींच्या वतीने गावातून ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सांगता गावातील मुख्य चौकात झाली. या वेळी गावातील सर्वांनी छत्रपतींच्या मंदिरात त्यांचे दर्शन घेतले.
सोमाटणे, साळुंब्रे, गोडुंब्रे, शिरगाव, सांगवडे, दारुंब्रे, चांदखेड, आढले, पाचाणे, कुसगाव, दिवड, ओवळे, पुसाणे, शिवली, भडवली, धनगव्हाण आदी गावात उत्सव समिती व शाळांच्या वतीने छत्रपतींच्या प्रतिमेला हार घालून गावातून ढोल, ताशा, झांज, लेझीमच्या गजरात मावळी वेशात ‘जय शिवाजी, जय भावानी’च्या जयघोषात मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीची सांगता गावातील ग्रामदैवत मंदिरात झाली. शिवली येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा वेष परिधान केलेल्या विद्यार्थी मावळ्यांच्या सहभागाने ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढून शिवजयंती साजरी केली, अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रेय जाधव यांनी दिली.