
विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा
पिंपरी : माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिखली येथे घडला. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सलमान खालीक मुजावर (वय ३३), सुलताना खालिक मुजावर (वय ५०), खालिक अब्दुल रहमान मुजावर (वय ६०), सद्दाम खालिक मुजावर (वय ३०, सर्व रा. पूर्णानगर, चिखली), मैनाज सरूराज शेख (वय ३५, रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आरोपींनी फिर्यादीस लग्नानंतर माहेरहून पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून मारहाण व शिवीगाळ केली. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला.
देहूत पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली
हाताने मारण्याचा धाक दाखवून पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली. हा प्रकार देहूगाव येथे घडला. महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या परंडवाल चौकातून त्रिमूर्तीनगरी येथून जात असताना समोरून दुचाकीवरून दोघेजण आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या आरोपीने फिर्यादीला हात उगारून मारण्याचा धाक दाखवला. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.
कोयता बाळगल्याप्रकरणी कारवाई
बेकायदारीत्या कोयता बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई दापोडी येथे करण्यात आली. ओंकार ऊर्फ दाद्या सोमनाथ गायकवाड (वय २१, रा. नेहरूनगर चौक, दापोडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे कोयता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्याला दापोडीतील रेल्वे पटरीखालील कच्चा रस्ता येथून ताब्यात घेतले.
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
घरझडती घेण्यासाठी आलेल्या सहकारी संस्थेच्या पथकाला घरझडती घेण्यास विरोध करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बाणेर, मोहननगर येथील पॅनोरमा इमारत येथे घडला. सहकारी संस्थेच्या सहकारी अधिकारी श्रेणी-२ नूतन श्रीकांत भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तनिष मनीष कासलीवाल व दोन महिला (सर्व रा. फ्लॅट क्रमांक ५०१, पॅनोरमा इमारत, मोहननगर, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी व इतर स्टाफ पंच व पोलिस स्टाफ असे मनीष राजमल कासलीवाल यांच्या राहत्या घराची झडती करण्यासाठी गेले. दरम्यान, आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांना घराची झडती घेऊ दिली नाही. घराच्या एका रूमचा दरवाजा बंद करून झडती घेण्यास परावृत्त केले.
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
पिंपळे सौदागर येथील काटेवस्ती येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. यात पाच तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली. स्पा मॅनेजर शाकीर समीरउद्दीन अहमद (वय २६, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. आसाम) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह पांडे चंकी धर्मेंद्र (वय २२, रा. आदर्शनगर, काळेवाडी), मंगेश भगवान जाधव (वय ३५, रा. हिंजवडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काही तरुणींना पैशांचे आमिष दाखवून एज लाईन टच द ब्युटी या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या स्पा सेंटरवर छापा टाकून पाच तरुणींची सुटका केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य असा ११ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.