नियमबाह्य गतिरोधकांवर कारवाई 
महापालिकेकडून कार्यवाही ः आतापर्यंत काढले २४९ गतिरोधक

नियमबाह्य गतिरोधकांवर कारवाई महापालिकेकडून कार्यवाही ः आतापर्यंत काढले २४९ गतिरोधक

सकाळ इम्पॅक्ट
--
पिंपरी, ता. १९ ः पुणे- मुंबई महामार्गावरील आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातून प्राधिकरणातील म्हाळसाकांत चौक रस्त्यावर नियमबाह्य गतिरोधक महापालिकेने उभारले होते. त्यावर दुचाकी वाहने आदळून जीवघेणे अपघात झाले होते. चारचाकी वाहने आदळून नुकसान होत होते. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने वर्षापूर्वी प्रसिद्ध केले होते. त्याचा हवाला देत एका सामाजिक संस्थेने राज्य सरकार व इंडियन रोड काँग्रेसकडे (आयआरसी) तक्रार केली होती. त्यावर सुनावणी होऊन नियमबाह्य गतिरोधक काढून टाकण्याचा आदेश आयआरसीने दिला होता. त्याची कार्यवाही महापालिकेने पोलिसांच्या सूचनेनुसार सुरू केली असून, नियमबाह्य गतिरोधक काढून टाकण्याचे व आवश्यक ठिकाणी नियमानुसार गतिरोधक टाकण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत २४९ गतिरोधक काढून टाकले आहेत.
शहरातील मुख्य रस्ते रुंद झाले आहेत. अंतर्गत काही रस्ते अरुंद असले तरी कॉंक्रिटची आहेत. लोकसंख्याही वाढली आहे. परिणामी वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यात आणखी भर पडत आहे. अनेक वाहनचालक मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवितात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी व वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार महापालिका गतिरोधक उभारते. पण, ते आयआरसी नियमानुसार व प्रमाणानुसार नसल्याने एकसारखे नसतात. अशा काही गतिरोधकांवर वाहने विशेषतः दुचाकी आदळून अपघात होतात. अशाच घटना पुणे-मुंबई महामार्गावरील आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातून प्राधिकरणातील म्हाळसाकांत चौक रस्त्यावर टाकलेल्या गतिरोधकांमुळे नियमितपणे घडत होत्या. अवघ्या काही दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा बळी गेला होता. त्याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. जागृत नागरिक महासंघाने तक्रार केली होती. परिणामी महापालिका दोषी ठरून नियमबाह्य गतिरोधक काढून टाकण्याचा आदेश दिला. त्याची कार्यवाही सध्या महापालिकेकडून सुरू आहे.

गतिरोधक हजारो; नोंद ६२६
वाहतूक नियमन करण्यासाठी शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर महापालिकेने वेगवेगळ्या प्रकारचे गतिरोधक उभारले आहेत. त्यात काही पेव्हिंग व कॉंक्रीट किंवा डांबर टाकून, काही रॅम्डलर स्ट्रीप, काही स्पीड टेबल यांचा समावेश आहे. काही खासगी व्यक्तींना आपापल्या भागात कॉंक्रिट टाकून उभारले आहेत. त्यांची संख्या हजारावर असली तरी महापालिकेच्या दप्तरी केवळ ६२६ गतिरोधकांची नोंद आहे.

नियम काय सांगतो
- आयआरसी’च्या निकषांनुसारच गतिरोधक उभारण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
- निकषांमध्ये न बसणारे गतिरोधक तातडीने काढून टाकण्याची प्रशासनाला सूचना
- वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार व त्यांच्या परवानगीने निकषांनुसार गतिरोधक हवेत
- ‘आयआरसी’च्या निकषानुसार चार इंच व १३ फुटांचा गतिरोधक असावा


पंधरा दिवसांपूर्वी मी आकुर्डी एमआयडीसीतील कंपनीत कामावर जात होतो. एका गतिरोधकावरून जाताना माझी गाडी (स्कूटर) स्लीप झाली. त्यामुळे खाली पडून चेहऱ्याला मार लागला होता. हाताला खरचटले होते. चेहऱ्यावर अजूनही सूज आहे. माझी पत्नी गृहिणी आहे. मी एकटाच कमावता आहे. रोजंदारीवर काम आहे. गाडीवरून पडल्यामुळे दोन-चार दिवस घरी राहावे लागल्याने रोजंदारी बुडाली.
- सुरेश, पिंपरी

गतिरोधकांबाबत इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन ‘आयआरसी’च्या निकषांनुसार गतिरोधक असावेत, व त्याचे उल्लंघन करणारे स्पीडब्रेकर्स ताबडतोब काढून टाकावेत, असा निकाल न्यायालयाने दिला होता. त्याबाबत आम्हीही तक्रार केली होती. त्याचा निकाल लागला असून त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.

- नितीन यादव, संस्थापक अध्यक्ष, जागृत नागरिक महासंघ

गतिरोधकांबाबत आमचा वाहतूक नियोजन विभाग बघतो. त्याच्या ‘ना हरकत’साठी विभागाचे पोलिस निरीक्षक निर्णय घेत असतात. त्यांचा अभिप्राय आम्ही घेतो. जे गतिरोधक योग्य नाहीत, आयआरसीच्या निकषांनुसार नाहीत, न्यायालयाच्या सूचनांचा आधार घेतो. त्यानुसार कोणते काढायचे, कोणते नाही काढायचे, कुठे नवीन गतिरोधक टाकायचे हे ठरविले जाते. जिथे गतिरोधक योग्य नाही, अशा ठिकाणी ‘स्ट्रीप’ची परवानगी देतो.
- सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

शहरातील गतिरोधकांबाबत ‘सकाळ’ने वृत्त दिले होते. एका सामाजिक संस्थेने तक्रार केली होती. त्यावर आयआरसीकडे सुनावणी झाली. त्या निकालानुसार महापालिका अधिकारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरातील रस्त्यांचा सर्व्हे सुरू केला आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार नियमबाह्य गतिरोधक काढले जात असून त्यांच्याच सूचनेनुसार आवश्यक ठिकाणी नियमानुसार गतिरोधक उभारणी केली जात आहे.
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

शहरातील गतिरोधकांची सद्य:स्थिती
क्षेत्रीय कार्यालय / काढून टाकले / आयआरसीनुसार / रम्ब्लर स्ट्रीप / स्पीड टेबल / एकूण
अ / १२ / २४ / २६ / १ / ६३
ब / २२ / ५ / ०० / ०० / ४६
क / ५८ / ६५ / १८ / ०० / १४१
ड / ४ / ०० / ०० / ०० / ४
ई / ३० / १८ / २१ / ०० / ६९
फ / ५७ / ९० / २३ / ०१ / १७१
ग / ५४ / १६ / ४ / ७ / ८१
ह / २३ / १२ / १४ / २ / ५१
एकूण / २४९ / २६० / १०६ / ११ / ६२६
----
फोटो ः 25823

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com