निवडणूक प्रचार खर्चात नाना काटे यांची आघाडी चिंचवड पोटनिवडणूक ः आतापर्यंत सर्व उमेदवार मिळून, प्रचार खर्च ५४ लाखांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक प्रचार खर्चात 
नाना काटे यांची आघाडी

चिंचवड पोटनिवडणूक ः आतापर्यंत सर्व उमेदवार मिळून, प्रचार खर्च ५४ लाखांवर
निवडणूक प्रचार खर्चात नाना काटे यांची आघाडी चिंचवड पोटनिवडणूक ः आतापर्यंत सर्व उमेदवार मिळून, प्रचार खर्च ५४ लाखांवर

निवडणूक प्रचार खर्चात नाना काटे यांची आघाडी चिंचवड पोटनिवडणूक ः आतापर्यंत सर्व उमेदवार मिळून, प्रचार खर्च ५४ लाखांवर

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० ः चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांचा सोमवारपर्यंत (ता. २०) सर्वाधिक २१ लाख ४६ हजार ९३३ रुपये खर्च झाला आहे. त्या खालोखाल महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा खर्च १५ लाख ६१ हजार ७८५ रुपये आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा खर्च १२ लाख ३९७ रुपये झाला आहे. सर्व उमेदवारांच्या प्रचार खर्चाची दुसऱ्या टप्प्यातील तपासणी सोमवारी करण्यात आली. त्यातून खर्चाची माहिती समोर आली. सर्व उमेदवारांचा प्रचार खर्च ५४ लाख १३ हजार ३७२ रुपये झाला आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. रविवारी (ता. २६) मतदान होणार आहे. शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी पाचपर्यंत प्रचाराची वेळ आहे. त्यामुळे अवघे चार दिवस उमेदवारांच्या हाती राहिले असून, सर्व मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. त्यासाठी घरोघरी भेटीगाठी, पदयात्रा, कोपरा सभा, जाहीर सभा घेतल्या जात आहेत. रिक्षा व चारचाकी वाहनांद्वारे ध्वनिक्षेपक, गाणी, कलापथक, पथनाट्ये, माहितीपत्रके अशा माध्यमातून प्रचार सुरू आहे. त्यासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रवास, चहा, नाश्ता, भोजनासह वाहने व जाहिरात फलकांवर खर्च होत आहे. त्या दैनंदिन खर्चाची नोंद उमेदवारांनी ठेवायची असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना खर्च सादर करायचा आहे.

खर्च मर्यादा ४० लाख
प्रत्येक उमेदवाराला प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये आहे. या खर्चाची तपासणी थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात केली जात आहे. त्यासाठी उमेदवार वा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक खर्च सादर करायचा आहे. महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल काटे, अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह २८ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांनीच बुधवारपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील (ता. १५) निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला आहे. दुसऱ्या टप्प्यातील खर्चाचा तपशील सोमवारी (ता. २०) सादर केला.

निवडणूक प्रचाराचा खर्च निर्धारित वेळेत न देणाऱ्या उमेदवारांना नोटीस दिली जाते. मात्र, निवडणूक आयोगाने नमूद केलेल्या कालमर्यादेत खर्चाचा तपशील न दिल्यास पुढील निवडणुका लढविण्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरू शकतो. असे होऊ नये, यासाठी सर्व उमेदवार वेळेत खर्च सादर करत असतात. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची पुढील तपासणी शुक्रवारी (ता. २४) केली जाणार आहे.
- सचिन ढोले, निवडणूक निर्णय अधिकारी, चिंचवड विधानसभा

असा झालाय प्रचार खर्च
उमेदवार / खर्च (२० फेब्रुवारीपर्यंत)
अश्विनी जगताप / १५,६१,७८५
विठ्ठल काटे / २१,४६,९३३
राहुल कलाटे / १२,००,३९७
उर्वरित २५ उमेदवार / ५,०४,२५७
एकूण / ५४,१३,३७२
(इतर पक्ष व अपक्षांमध्ये सर्वाधिक ५७ हजार ७८० रुपये खर्च किशोर काशीकर यांचा आहे.)
----