सोसायट्यांत प्रचारास ‘नो एंट्री’

सोसायट्यांत प्रचारास ‘नो एंट्री’

पिंपरी, ता. २२ : चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. मात्र, या मतदारसंघातील अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये राजकीय प्रचारासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसा अनेक सोसायटीच्या कमिटीने ठरावच केला आहे. परिणामी, राजकीय प्रचारास रहिवासी सोसायट्यांमध्ये ‘नो एंट्री’ पाहायला मिळत आहे.
हिंजवडी, तळवडे आयटी क्षेत्रात काम करणारा आयटीयन्स चिंचवड विधानसभा मतदार संघातील वाकड, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे निलख, रावेत, चिंचवड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात सोसायट्यांमध्ये वास्तव्यास आहे. या सोसायटीतील प्रत्येक रहिवासी येथील मतदार आहे, असे नाही. त्यामध्ये भाडेकरूंची संख्या मोठी आहे. ते येथील मतदार नाहीत. त्यामुळे निवडणूक काळात राजकीय प्रचाराचा त्रास नको, म्हणून अनेक सोसायटी कमिटीने या प्रचाराला बंदी घातली आहे. त्या अनुषंगाने रीतसर ठरावच संमत करण्यात आले आहेत.
सोसायटीतील नोकरदार वर्ग दिवसा कामावर असतो, त्यावेळी घरी महिला, मुले किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतात. त्यांना या प्रचाराचा त्रास नको किंवा सुरक्षेच्या दृष्टीने अनोळखी व्यक्तींना सोसायटीत प्रवेश निषिद्ध केला आहे. तसेच अनेक आयटी कंपन्यांचे कामकाज रात्री चालते, अशा वेळी दिवसा आरामात व्यत्यय नको. यासाठीही सोसायटी कमिटीने रहिवाशांच्या मागणीवरून घरोघरी जाण्यास किंवा सोसायटीत येण्यास मज्जाव केला असल्याचे सांगितले जाते.

सोसायटीत वाद घालू नका
सोसायटीच्या सुरक्षा यंत्रणेला याबाबत तशा सूचनाच देण्यात आल्या आहेत. मात्र, काही सोसायटीत प्रवेशद्वारावर प्रचार पत्रके स्वीकारले जात असून, ते प्रत्येक सदनिकाधारकाच्या पत्रपेटीत टाकले जात आहेत. सोसायटीत प्रचारासाठी प्रवेश दिला जात नाही. त्यावरून सोसायटी प्रशासन किंवा सुरक्षारक्षकांशी वाद घालू नका. अशा सूचनाच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

जाहिरातीसाठी भाडे
बऱ्याच सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात करायची असल्यास दिवसागणिक भाडे ठरवले आहे. नोटीस बोर्डवर किंवा परिसरात स्टॅंडी लावण्यासाठी हे भाडे आकारले जाते. या जाहिरात दरामध्येच राजकीय प्रचाराचे बॅनर, पत्रके लावण्यास सोसायटीची हरकत नसल्याचे समजले आहे.

‘‘कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा राजकीय प्रचाराचा त्रास नको, यासाठी फ्लॅटधारकांनी केलेल्या मागणीनुसार अनेक सोसायट्यांच्या सर्वसाधारण सभेत तसे ठराव मंजूर केलेले आहेत. काही सोसायट्यांचे असे ठराव पाच-दहा वर्षांपूर्वीचे आहेत. मात्र, जर एखादा उमेदवार सोसायटीतील रहिवासी असेल तर तो त्याच्या वैयक्तिक पातळीवर प्रचार करू शकतो. अशी काही सोसायट्यांमध्ये सूट देण्यात आली आहे.’’
- किरण वडगामा, अध्यक्ष पलाश सोसायटी, वाकड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com