
वायसीएम उपहारगृह निविदेवर आक्षेप
पिंपरी, ता. २१ ः महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) उपहारगृह चालविण्यास देण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर माहिती अधिकार कार्यकर्त्याने आक्षेप घेतला आहे. विशिष्ट संस्थेस काम देण्यासाठी २०१६ च्या अटी-शर्ती बदलून २०२२ च्या अटी-शर्ती शिथिल केल्याचा आक्षेप आहे.
आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१६ च्या निविदेत सर्व्हिस टॅक्स रजिस्ट्रेशन बंधनकारक (जीएसटी), वार्षिक उलाढाल ५० लाख, २१ लाख बॅंक गॅरंटी, सहा महिन्यांचे भाडे आगाऊ, कामगार कायद्यानुसार नोंदणी बंधनकारक, प्रोफेशनल टॅक्स भरत असल्याचा पुरावा बंधनकारक होता. मात्र, आताच्या निविदेद्वारे निवड झालेल्या संस्थेने जीएसटी प्रमाणपत्र एनए दाखवले आहे. वार्षिक उलाढाल ३५ लाख ४१ हजार २३० रुपये, बॅंक गॅरंटीची अट शिथिल आहे. सहा महिन्याच्या भाडे आगाऊ देण्याची अट नाही. कामगार कायद्यानुसार नोंदणी व प्रोफेशन टॅक्स या अटी नाहीत, असे आक्षेप आहेत. याबाबत महापालिका सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ‘‘अधिकाधिक संस्था सहभागी व्हाव्यात, यासाठी अटी व शर्ती ठरवल्या आहेत. अतिशय सोपी पद्धत वापरली आहे. त्यामुळे सात संस्था सहभागी झाल्या. पूर्वी दोनच संस्था असायच्या. आपल्याला केवळ जागा द्यायची आहे. निविदेत दोष असता तर सहभागी झालेल्या सातही जणांनी तक्रारी केल्या असत्या.’’
--