
अतिरिक्त आयुक्त-एक पदी हवाय आयएएस अधिकारी
पिंपरी, ता. २१ ः महापालिका सेवेतील अभियांत्रिकी विभागाच्या आकृतीबंधामध्ये मुख्य अभियंता अभिमानाची दोन अतिरिक्त पदे नव्याने निर्माण करावीत. अतिरिक्त आयुक्त-एक पदाच्या निकषामध्ये बदल करून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असावा, असे पत्र प्रशासक शेखर सिंह यांनी राज्य सरकारला दिले आहे. त्याबाबत अधिक माहिती राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी मागितली आहे. त्यामुळे राज्य सेवेतील अधिकारी असलेल्या स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्त पदावरील नियुक्ती प्रलंबित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांची १३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य सरकारने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पण, आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांना रुजू करून घेतले नव्हते. त्यानंतर सरकारने २३ सप्टेंबर रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करून प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. त्याविरुद्ध झगडे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) दाद मागितली. त्याचा निकाल झगडे यांच्या बाजूने लागला आहे. झगडे यांना दोन आठवड्यात अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती द्या, असा आदेश मॅटने राज्य सरकारला शुक्रवारी (ता. १७) दिला असून जांभळे यांची नियुक्ती रद्द केली. मात्र, मंगळवारपर्यंत काहीही बदल झालेले नव्हते. दरम्यान, २० सप्टेंबर २०२१ रोजीच्या महापालिका सभा ठरावानुसार, अभियांत्रिकी विभागाच्या आकृतीबंधात आणि अतिरिक्त आयुक्तांच्या निकषात बदल करण्याबाबतचे पत्र सिंह यांनी २८ डिसेंबर रोजी राज्य सरकारला पाठवले होते. त्यानुसार सरकारचे कार्यासन अधिकारी चव्हाण यांनी सिंह यांच्याकडे अधिक माहिती मागवली आहे.
सरकारने मागवलेली माहिती
- महापालिकेच्या २० सप्टेंबर २०२१ च्या सभा ठरावाची प्रत
- आकृतीबंधात बदल व अतिरिक्त आयुक्त पदाबाबत प्रशासन विभागाची प्रत
- पदनिर्मिती व वेतनश्रेणी बदलामुळे महापालिकेवर पडणाऱ्या खर्चाचा तपशील
- मुख्य अभियंता पदाच्या आवश्यकतेचे कारण, त्याचे निकष, कर्तव्य व जबाबदारी
- इतर महापालिकेत मुख्य अभियंता पद असल्यास अर्हतेबाबत अभिप्राय
महापालिकेने केलेली मागणी
- महापालिका सभा ठरावानुसार शहर अभियंता व मुख्य अभियंता १ व २ पदोन्नतीने
- तीनही पदांसाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी व महापालिकेत सहशहर अभियंता पदाचा ३ वर्ष अनुभव
- अतिरिक्त आयुक्त १ प्रशासकीय सेवेतून प्रतिनियुक्ती, अर्हता भारतीय प्रशासकीय सेवा
- अतिरिक्त आयुक्त २ प्रशासकीय सेवेतून प्रतिनियुक्ती राज्य सरकारी सेवा सचिव, उपसचिव दर्जा
- अतिरिक्त आयुक्त ३ महापालिका सेवेतून सरकारने निश्चित केलेल्या अर्हतेनुसार पदोन्नती
---