प्रत्येक जिल्ह्यात क्रीडाकूल विद्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येक जिल्ह्यात क्रीडाकूल विद्यालय
प्रत्येक जिल्ह्यात क्रीडाकूल विद्यालय

प्रत्येक जिल्ह्यात क्रीडाकूल विद्यालय

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः राज्यात जिल्हास्तरांवर आयुर्वेद दवाखाने सुरू करून खेळाडूंवर मोफत उपचार व्हावेत, प्रत्येक जिल्ह्यात क्रीडाकुल विद्यालय सुरू करावेत, असे ठराव राष्ट्रीय आयुर्वेद क्रीडा परिषदेत करण्यात आले.
निगडी प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकूलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने आयुर्वेद व्यासपीठ आणि महाराष्ट्रीय मंडळ यांच्या सहयोगाने राष्ट्रीय आयुर्वेद क्रीडा परिषद आयोजित केली होती. तिचा समारोप क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, प्राचार्य मनोज देवळेकर, वैद्य धनंजय कुलकर्णी, आगाशे महाविद्यालयाचे डॉ. महेश देशपांडे, आयुर्वेद व्यासपीठचे विलास जाधव, सागर देशपांडे, वैद्य मेधा देवळेकर, वैद्य उदय जोशी, स्मिता देशपांडे, वैद्य सचिन सरपोतदार, वैद्य योगिता जमदाडे यांच्या उपस्थितीत झाला. ऑलिंपिक पदक मिळवणारे खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनीने क्रीडाकुल शाळेची मुहूर्तमेढ रोवली. या माध्यमातून अनेक खेळाडू तयार होत आहेत. अशा प्रकारच्या शाळा देशाच्या प्रत्येक भागात सुरू झाल्या पाहिजेत. खेळाडूंची मानसिक शारीरिक जडणघडण होण्यासाठी आयुर्वेद व योग यांचा चांगला उपयोग होऊ शकतो, अशा विश्वास डॉ. बापट यांनी व्यक्त केला.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी कशी काळजी घ्यावी, तत्काळ उपचार पद्धती, मानसिक आरोग्य आणि स्वस्थता यावर योगाभ्यास अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आयुर्वेद क्रीडा परिषदेमध्ये मेधा देवळेकर यांनी ठराव मांडले. ते सर्वानुमते मंजूर झाले. हे ठराव केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. शुभांगी बहिरट, दीप्ती धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले. बागेश्री देवकर यांनी आभार मानले.

परिषदेत २७ शोधनिबंध
परिषदेमध्ये संशोधकांनी २७ शोधनिबंध सादर केले. तसेच दहा चित्रकृती सादर केल्या. परीक्षकांनी निवडलेल्या शोधनिबंध व चित्रकृतींमधून निवड झालेले संशोधक डॉ. दिव्यश्री के. एस., डॉ. रवीना दळवी, डॉ. सानिका खोकले, डॉ. किरण मेंडेकर, डॉ. हरी शंकर, डॉ. अपूर्वा मुंडर्गी यांना गौरविण्यात आले.

परिषदेतील मंजूर ठराव
- क्रीडा क्षेत्रात आयुर्वेद उपचार पद्धतीस मान्यता मिळावी
- अधिक संशोधनासाठी केंद्र व राज्य सरकारचे अनुदान मिळावे‌
- आयुर्वेद उपचारांची माहिती व जनजागृतीसाठी अभ्यासक्रम व प्राथमिक प्रशिक्षण केंद्र सुरू करावेत
- केरळ राज्याप्रमाणे अन्य राज्यांमध्येही आयुर्वेद केंद्र सुरू करावेत
- राज्यात जिल्हास्तरावर आयुर्वेद दवाखाने सुरू करून खेळाडूंवर मोफत उपचार व्हावेत
- प्रत्येक जिल्ह्यात क्रीडाकुल विद्यालय सुरू करावेत

कोण काय म्हणाले...
समाजाच्या जडणघडणीमध्ये क्रीडा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. शहराला राज्याला आणि देशाला उज्ज्वल भविष्य निर्माण करून देण्याचे काम त्याद्वारे होते. ज्ञानप्रबोधिनीच्या क्रीडाकुल विद्यालयाने आयुर्वेद क्रीडा परिषद आयोजित करून देशातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे.
- सुहास पाटील, उपसंचालक, क्रीडा

आयुर्वेद आणि चरक संहिता हा हिंदुस्थानचा हजारो वर्षांचा वारसा आहे. क्रीडाकूलमधील खेळाडूंना आयुर्वेद औषधी व योगाभ्यास करून घेतला जातो. सबळ समाज निर्मितीसाठी आयुर्वेदाचा अवलंब हिताचा आहे. नवीन संशोधनात ज्ञानप्रबोधिनी अग्रेसर असून ‘सूक्ष्म आयुर्वेद’ या संकल्पनेवर संस्थेचे संशोधन सुरू आहे.
- डॉ. गिरीश बापट, संचालक, ज्ञानप्रबोधिनी