निवडणूक आयोगाला मार्गदर्शन केल्याची शक्यता : शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक आयोगाला मार्गदर्शन केल्याची शक्यता : शरद पवार
निवडणूक आयोगाला मार्गदर्शन केल्याची शक्यता : शरद पवार

निवडणूक आयोगाला मार्गदर्शन केल्याची शक्यता : शरद पवार

sakal_logo
By

चिन्हासकट पक्ष एखाद्या गटाला देण्याचा प्रकार पहिल्यांदाच
शरद पवार यांची टीका ः निवडणूक आयोगाला मार्गदर्शन झाले असण्याची शक्यता

पिंपरी, ता. २२ : यापूर्वी देशात काँग्रेस, समाजवादी पक्षात फूट पडली पण आख्खा पक्ष चिन्हासकट एखाद्या गटाच्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न यापूर्वी कधीच झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाला काही मार्गदर्शन झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी महाराष्ट्रात फिरत आहे. नेते जरी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले असले तरी सामान्य कट्टर शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. याची माहिती मी घेतली आहे, असे राष्ट्रवादी काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता. २२) सांगितले.
शरद पवार यांनी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शहरात सभा घेतल्या. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची राजकीय भूमिका, पिंपरी चिंचवडचा विकास आणि देशातील अराजकाच्या भूमिकेवर परखड भाष्य केले. यावेळी ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे, प्रदेश युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख, आमदार नीलेश लंके, अतुल बेनके, अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘सत्तेचा गैरवापर करून शिवसेना फुटली. राजकीय पक्ष हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. तांत्रिक मुद्यांचा बागुलबुवा करत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोक त्यांना धडा शिकवल्याखेरीज राहणार नाहीत. सध्या हा निर्णय न्यायालयाच्या कक्षेत आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. देशातील यापुढील प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन झालेले पहायला मिळेल. जनता बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यांनी त्रस्त झाली आहे. जनता परिवर्तनाला अनुकूल भूमिका घेईल.’’

बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस
गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. त्यांच्याजवळ पाच- दहा मिनिटे थांबलो. त्यांच्या प्रकृतीवर ताण पडू नये म्हणून मी फार वेळ थांबलो नाही. याबाबत माझ्यापेक्षा अधिक चांगलेपणाने एकनाथ खडसे सांगतील, असे सांगून खडसे यांच्याकडे माईक सोपवला. त्यावेळी खडसे म्हणाले, ‘‘भाजपचे मी ४२-४५ वर्ष कार्य केले आहे पण अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्या काळातील भाजपमध्ये असे प्रकार घडत नव्हते.’’

विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचा पायंडा
संजय राऊत आणि अशोक चव्हाण यांच्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. आपल्या विरोधी विचारांच्या नागरिकांना देशद्रोही ठरवण्याचा अनिष्ट पायंडा पाडला जात आहे. प्राध्यापक म्हणून आयुष्यभर काम करणाऱ्यांना, सामान्य आदीवासींचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना देशद्रोही ठरवण्याचे प्रयत्न केले जात असल्याबद्दल पवारांनी चिंता व्यक्त केली.
फोटोः 26375