
मतदारांच्या सोयीसाठी घरपोच ‘व्होटर स्लीप
पिंपरी, ता. २२ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सर्व मतदारांना घरपोच मतदार चिठ्ठ्या (व्होटर स्लीप) वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे पाच लाख ६८ हजार व्होटर स्लीप वाटण्याचे नियोजन आहे. नायब तहसीलदार श्वेता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली चिठ्ठ्या वाटपाचे काम सुरू आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५१० मतदान केंद्र असून दिव्यागांसाठी सुविधा उपलब्ध असेल. दिव्यांग, वयोवृद्ध, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी साहाय्य करण्याकरिता स्वयंसेवक नेमले आहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा असून भरारी पथक, गस्ती पथक सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांद्वारे महत्त्वाच्या नाक्यांवर संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. आचारसंहिताभंगाच्या तक्रारी असतील तर नागरिकांनी सी-व्हिजील ॲपवर तत्काळ तक्रार दाखल करावी, असे आवाहन ढोले यांनी केले आहे.
मतदानाचे महत्त्व
सार्वजनिक इमारती, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात, विविध सोसायट्यांमधून छोट्या-छोट्या कार्यक्रमाद्वारे, पथनाट्याद्वारे कलाकारांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. मागील मतदानावेळी कमी संख्येने मतदान झालेल्या भागांवर लक्ष केंद्रित करून विशेष मोहीम राबवून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
कामे अंतिम टप्प्यात
चिन्हांकित मतदार याद्या अंतिम करणे, टपाली मतदानाचे नियोजन करणे, साहित्य वाटप व स्वीकृतीसाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचारीवर्गाचे प्रशिक्षण घेणे, मतदान साहित्य वाटप आणि स्वीकृतीच्या ठिकाणी पार्किंगची पुरेशी सोय करणे आदी कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. बहुतांश कामे पूर्णत्वास गेली आहेत. मतदान प्रक्रिया व कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी पीएमपी बस व इतर वाहनांची सोय केली आहे. खबरदारी म्हणून वाहनांना जीपीएस प्रणाली बसविली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाले...
- प्रत्येक मतदारांपर्यंत व्होटर स्लीप पोहोचल्या जातील
- ५१० बीएलओ व ८४ नोडल अधिकाऱ्यांमार्फत स्लीप वाटप
- मतदान केंद्र कुठे आहे, याबाबतची माहिती मतदारांना दिली जात आहे
- कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी मताधिकार बजवावा
- मतदानाची टक्केवारी वाढीसाठी कलापथके, विद्यार्थी स्वयंसेवक कार्यरत
---