निवडणूक प्रचारात मजुरांची ‘चंगळ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक प्रचारात मजुरांची ‘चंगळ’
निवडणूक प्रचारात मजुरांची ‘चंगळ’

निवडणूक प्रचारात मजुरांची ‘चंगळ’

sakal_logo
By

निवडणूक प्रचारात मजुरांची ‘चंगळ’

दिवसाचा रोज मिळून मिळते पोटभर जेवण अन् प्रवासासाठी गाडीही

पिंपरी, ता. २३ : अन्यवेळी दुपारपर्यंत मजूर अड्ड्यावर थांबूनही हाताला काम मिळत नाही. मात्र, चिंचवड व कसबा पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर मजुरांना प्रचारातून रोजगार उपलब्‍ध झाला आहे. त्यामुळे आठ-दहा दिवस का होईना परंतु हंगामी रोजगार मिळाला. घर खर्च भागवण्यासाठी हातभार लागला, अशा भावना रहाटणी, डांगे चौक येथील मजूर अड्ड्यावरील मजूर व्यक्त करीत आहेत.

इमारतींचे बांधकाम किंवा बांधकाम साहित्याचे ‘लोडिंग-अनलोडिंग’ करण्यासाठी. सोसायटीच्या साफसफाईचे अथवा बगीच्यामध्ये माळी काम करण्यासाठी घरातील किंवा बंगल्यातील अवजड कामे करायची झाल्यास आपल्याला साहजिकच कामगार किंवा मजुरांची आठवण येते. अशा वेळी नकळत आपण चौकांतील वर्दळीच्या ठिकाणी जातो. त्यामुळेच नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन मजूर अड्डे तयार झाले आहेत. मात्र, आता राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांकडे सध्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी धूसर होत चालली आहे. हातचे काम सोडून राजकीय पुढाऱ्यांच्या मागे फिरायला कोणी धजावत नाही. मात्र, पैसा असेल तर पगारी कार्यकर्ते उभा करणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही. प्रचार सभा, रॅली किंवा पदयात्रा यासाठी पगारी कार्यकर्त्यांची मागणी सध्या राजकीय पक्षांमध्ये वाढली आहे.

प्रचारादरम्यान अचानक पन्नास-शंभर कार्यकर्ते कसे जमवायचे, हा मोठा प्रश्न पुढाऱ्यांसमोर उभा राहतो. मात्र, त्यावर उपाय म्हणून मजूर अड्ड्यावरील आपले कार्यकर्ते म्हणून मिरविले जातात. राज्याच्या दुष्काळी भागातून आलेल्या या मजुरांनाही काम हवे असते, ते कोणतेही असो त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना रोजगार हवा असतो. त्यांना आपले घर चालवायचे असते.

जाणे-येणे व जेवणाची सुविधा
राजकीय नेत्यांची सभा व पदयात्रेसाठी आरामदायी बस किंवा इतर वाहनांमधून येथील मजुरांना नेले जाते. त्यात महिलांची संख्या मोठी आहे. राजकीय प्रचार किंवा सभा झाल्यानंतर जेवणाची सुविधा केलेली असते. त्यात मिष्टान्नही मिळतो. तसेच कधीतरी मांसाहारही मिळतो. मजुरीवर दिवसभर काम करून पाचशे रुपये मिळतात. मात्र, प्रचारासाठी गेल्यास दोन ते तीन तासांसाठी जेवणासह चारशे किंवा पाचशे रुपये मिळतात.

नियोजन व नियंत्रणासाठी प्रमुख
मजुरांना प्रचारासाठी नेल्यानंतर त्यांना राजकीय पक्षांचे झेंडे, चिन्ह, शाली, टोपी किंवा टी शर्ट दिले जातात. तसेच घोषणा व प्रचाराची माहिती दिली जाते. त्यांच्यावर नियंत्रण व पैशाची वाटप करण्यासाठी प्रमुखाची नियुक्ती केलेली असते. या प्रमुखाला त्याचा मोबदलाही दिला जातो. प्रचारासाठी मिळालेले हे टी शर्ट निवडणुकीनंतर मजूर कामात वापरतात.

मजूर अड्ड्यांबाबत...
- शहरात काळेवाडी, वाकड फाटा, नेहरूनगर, पिंपरी चौकात आहेत मजूर अड्डे
- दररोज सकाळी सहा ते दहा या वेळेत अड्ड्यांवर असते गर्दी
- मजूर अड्ड्यांवर मजुरांना कामानुसार पैसे मिळतात
- दिवसभरासाठी साधारण पाचशे रुपये मिळते रोजंदारी
- निवडणूक काळात मजुरांना प्रचाराचे काम मिळविण्यासाठी लागते चढाओढ


‘‘दररोज पन्नास-शंभर महिला येथून प्रचारासाठी नेल्या जातात. प्रचार झाल्यानंतर परत आणून सोडले जाते. पैसेही व्यवस्थित मिळतात. जेवणही चांगले असते. आम्ही पोट भरण्यासाठी येथे आलेलो आहोत. आम्हाला काम हवे असते. ते बिगारी असो की प्रचाराचे. दररोज हाताला काम मिळणे महत्त्वाचे आहे.’’
- राहीबाई शिंदे (बदलले नाव), मजूर महिला