
चिंचवडमध्ये रात्री आठपर्यंत मतदान भाजप, राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला
पिंपरी, ता. २६ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी मतदानाची वेळ होती. मात्र, सायंकाळी सहापर्यंत मतदान केंद्रावर उपस्थितीत राहिलेल्या मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता आला. त्यामुळे काही केंद्रांवर रात्री आठपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. ५०. ४७ टक्के एकूण मतदान झाले. भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेससह अपक्ष उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
वेबकास्टींग यंत्रणा
थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवनातील नियंत्रण कक्षात निवडणूक विभागाने वेबकास्टींग यंत्रणा उभारली होती. त्याद्वारे २५५ मतदान केंद्रांवरील संपूर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आले. या कक्षाला निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयातील तर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले त्यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
उमेदवारांचे मतदान
- दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू विजय जगताप आणि शंकर जगताप यांच्यासह भाजप उमेदवार अश्विनी जगताप व त्यांची कन्या ऐश्वर्या यांनी पिंपळे गुरवमधील माध्यमिक विद्यालय येथील केंद्रावर सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी मतदान केले.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल स्कूल केंद्रावर सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मतदान केले.
- अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह त्यांच्या मातोश्री तथा माजी नगरसेविका कमल कलाटे, पत्नी वृषाली कलाटे यांनी वाकड येथील माऊंट लिटेरा शाळेतील केंद्रावर सकाळी साडेसातच्या सुमारास मतदान केले.
दृष्टिक्षेपात मतदार व मतदान
वर्णन / मतदार / मतदान / टक्केवारी
पुरुष / ३,०२,९४६ / १,५७,८२० / ५२.१०
महिला / २,६५,९७४ / १,२९,३२१ / ४८.६२
इतर / ३४ / ४ / ११.७६
एकूण / ५,६८,९५४ / २,८७,१४५ / ५०.४७
यापूर्वीच्या निवडणुकांतील मतदान
वर्ष / मतदार / मतदान / टक्केवारी
२००९ / ३,९१,८५७ / १,९७,९२८ / ५०.५१
२०१४ / ४,८४,३५१ / २,७२,५५७ / ५६.९३
२०१९ / ५,०२,८६५ / २,७८,३७४ / ५३.६९
....